मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनापूर्वी जुन्नरमध्ये एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उद्या जरांगेंचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे.
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ते हजारो कार्यकर्त्यांसह बुधवारी जालन्यातील अंतरवली सराटीतून निघाले. त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर येथे झाला असून आता हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे.
आंदोलनात दुर्दैवी घटना, एका आंदोलकाचा मृत्यू
मुंबईच्या दिशेनं सुरू झालेल्या या लढ्यात दु:खद घटना घडली. जुन्नरमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या सतीश देशमुख या मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला. ते बीडच्या केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी होते. जुन्नरमध्ये आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
जरांगेंची संवेदना: "सतीश भैय्याचं बलिदान..."
या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले, *"मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेनं जात असताना सतीश भैय्याचं बलिदान झालं आहे. हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आपण संयमाने आणि टप्प्याटप्प्याने आरक्षणाची लढाई लढणार आहोत."*
आंदोलनाला मर्यादित परवानगीवर नाराजी
सरकारने आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी केवळ एका दिवसाची परवानगी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी ही अट कदापि मान्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाचा लढा दीर्घकाळ चालेल आणि न्याय मिळेपर्यंत सुरू राहील, असं ते म्हणाले.

