- Home
- Maharashtra
- मोठा धक्का: मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलनास मनाई; हायकोर्टाचा स्पष्ट नकार, सरकारला दिले महत्त्वाचे निर्देश
मोठा धक्का: मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलनास मनाई; हायकोर्टाचा स्पष्ट नकार, सरकारला दिले महत्त्वाचे निर्देश
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नियोजित मुंबई मोर्चाला हायकोर्टाने आझाद मैदानात उपोषण करण्यास नकार दिला. वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, जरांगेंना नवी मुंबईतील खारघर किंवा अन्यत्र आंदोलन करण्यास सांगण्यात आले

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, या कारणास्तव हा निर्णय देण्यात आला आहे. परिणामी, जरांगेंच्या आंदोलनाच्या नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हायकोर्टाचा स्पष्ट आदेश, मुंबईत नाही; इतरत्र करा आंदोलन
मराठा आरक्षणासंदर्भातील एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने सांगितले की, जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे शहरात आंदोलन नको, परंतु नवी मुंबईतील खारघर किंवा अन्य कोणत्याही जागी आंदोलनाची परवानगी राज्य सरकार देऊ शकते, असे निर्देश कोर्टाने दिले.
सरकारचा मध्यस्थीचा प्रयत्न, पण जरांगेंचा ठाम निर्धार
गणेशोत्सव काळात आंदोलन टाळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) राजेंद्र साबळे हे आज सकाळी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगेंची भेट घेऊन विनंती केली. मात्र, आरक्षणाशिवाय कोणतीही माघार नाही, अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली. "सरकारने आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मुंबईकडे निघणारच," असे वक्तव्य जरांगेंनी माध्यमांसमोर केले. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांच्या आंदोलनाच्या धोरणात आता काय बदल होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जरांगेंचा नियोजित मोर्चा मार्ग, ठिकाणांची साखळी
मनोज जरांगेंनी काल पत्रकार परिषदेत मोर्चाचा संपूर्ण मार्ग जाहीर केला होता.
प्रस्थान – 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून
मार्ग – छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे, लोणावळा, वाशी, चेंबूर
मुक्काम – 27 ऑगस्ट, शिवनेरी किल्ला
मुंबई प्रवेश – 28 ऑगस्ट सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचण्याचा प्रारूप
परंतु आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर हा संपूर्ण मोर्चा मार्ग आणि आंदोलनाची जागा बदलण्याची गरज भासणार आहे.
आता पुढे काय?
हायकोर्टाच्या मनाईमुळे मनोज जरांगेंना नवीन रणनीती आखावी लागणार आहे. आंदोलन मुंबईत करायचे की राज्य सरकारने सूचवलेल्या ठिकाणी, यावर जरांगेंचा पुढील निर्णय महत्त्वाचा ठरेल.
सुत्रांच्या मते, जरांगेंच्या पुढील पावलांवर मराठा समाजाच्या आंदोलनाचे भवितव्य अवलंबून असेल. आरक्षणाच्या लढ्याचा पुढचा टप्पा नेमका कसा असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

