मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पोलिसांनी महिलांवर केलेल्या लाठीमारावरून त्यांनी संतप्त सवाल उपस्थित केले. 

अंतरवाली सराटी : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "आमच्या आई-बहिणींवर लाठीमार झाला, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तेव्हा तू कुठे होतीस?" असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भूमिकेवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.

जरांगेंची स्पष्ट भूमिका: फडणवीसांनी आरक्षण द्यावं, आम्ही त्यांच्या आईची पूजा करू

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, "मी कधीही देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले नाहीत. जर काही शब्द बोलण्याच्या ओघात गेले असतील, तर मी तो माघारी घेतो. मात्र, तुम्ही देखील आमच्या आई-बहिणींवर झालेल्या अत्याचाराबद्दल उत्तरदायी आहात." "पोलिसांनी आमच्या माता-भगिनींवर लाठीमार केला, त्या रक्ताच्या थारोळ्यात होत्या. त्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा करायची होती, पण तुम्हीच त्यांना पदं दिलीत. आमच्या आईवर 307 लावली, मग तुमच्यावर लावली तर चालेल का?" असा संतप्त सवाल त्यांनी फडणवीस आणि वाघ यांना उद्देशून केला.

"आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरीही रक्तात होत्या, तेव्हा तू कुठे होतीस?"

चित्रा वाघ यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जरांगेंनी खवळलेली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "ती वाघीण जी बोलतेय, ती आमच्या आईला शिवी दिल्याचा आरोप करते. पण ज्या दिवशी आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, त्या दिवशी ती कुठे होती?" "तुझी जात आता जागी झाली का? कोणाची भाटगिरी करत बसलीस? तू बाई आहेस, तसं आमच्याकडेही बाया आहेत," असा रोष त्यांनी व्यक्त केला.

27 ऑगस्टला मोर्चा मुंबईकडे रवाना होणार

जरांगे पाटील यांनी जाहीर केलं की, 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीहून मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. हा मोर्चा चाकण, खेड, वाशी आणि चेंबूर मार्गे मुंबईत प्रवेश करेल. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मोठा एल्गार उभा राहण्याची चिन्हं दिसत आहेत.

राजकीय वातावरण तापलं, चित्रा वाघ काय उत्तर देतील याकडे लक्ष

चित्रा वाघ, प्रसाद लाड यांसह भाजप नेत्यांनी रविवारी जरांगेंवर जोरदार टीका केली होती. त्यावर जरांगेंनी अधिक तीव्र प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांना खुले आव्हान दिले आहे. "संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल," असे देखील त्यांनी इशार्‍याने सांगितले. आता यावर चित्रा वाघ काय उत्तर देतात, याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.