आझाद मैदानावर मनोज जरांगेंसह त्यांच्या आंदोलकांनी कालपासून ठाण मांडले आहे. अशातच मुंबईत झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाल्याने आंदोलकांचे हाल झाले. एवढेच नव्हे शौलायांमधील पाणी देखील नसल्याने त्यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागला.
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून तसेच सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. मात्र, मुंबईतील सततच्या पावसामुळे आंदोलकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आझाद मैदानात चिखलाचे साम्राज्य
दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखल आणि पाण्याची डबकी तयार झाली आहेत. मुंबई महापालिकेने शुक्रवारी वाळू आणि खडी टाकून खड्डे बुजवले होते. परंतु सततच्या पावसामुळे ती खडी वाहून गेल्याने मैदान पुन्हा चिखलमय झाले आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवशी आंदोलक कसे बसणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंदोलकांचा सीएसएमटीवर मुक्काम
पावसामुळे आझाद मैदानात मुक्काम करणे कठीण झाल्याने अनेक आंदोलकांनी काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर आसरा घेतला. प्लॅटफॉर्मवरच त्यांनी झोप काढली. सकाळी पुन्हा हे सर्व आंदोलक आझाद मैदानात आंदोलनात सामील झाले. "जोपर्यंत जरांगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
शौचालयात पाणी संपल्याने बिसलरीचा वापर
आझाद मैदान व परिसरातील शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव निर्माण झाल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका मराठा बांधवाने ट्रकभर बिसलरीच्या बाटल्या आणल्या आणि त्याच पाण्याचा वापर शौचालयासाठी करण्यात आला. "आम्ही समुद्रात राहत आहोत, अशीच परिस्थिती आहे. रात्रभर कोणीही झोपले नाही. कपडे पूर्ण ओले झाले," अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली.
सरकारकडे सर्वांचे लक्ष
पावसामुळे बिकट परिस्थितीतही मराठा आंदोलक ठामपणे आंदोलनात बसले आहेत. मात्र, पिण्याचे पाणी, तंबू आणि इतर सोयी न दिल्याने मुंबई महापालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे. आता राज्य सरकार आणि महापालिका आंदोलकांसाठी काय उपाययोजना करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…


