- Home
- Maharashtra
- Manoj Jarange Patil : उपोषण सोडतानाचा भावुक क्षण! मनोज जरांगे पाटील धायमोकलून रडले, विखे पाटलांनी दिला आधार
Manoj Jarange Patil : उपोषण सोडतानाचा भावुक क्षण! मनोज जरांगे पाटील धायमोकलून रडले, विखे पाटलांनी दिला आधार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारने सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपले. जरांगे पाटलांनी भावुक होत हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आणि महाराष्ट्रातील मराठा समाज एकसंध असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई : मराठा आरक्षणासाठीचा लढा निर्णायक वळणावर आला आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत आठपैकी सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. मंचावरच सरकारचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. भावुक क्षणात त्यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. “हा लढा सोपा नव्हता. पण दोन कोटी मराठा बांधवांच्या पाठिंब्याने हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.”
"महाराष्ट्राला विभागांमध्ये कधी पाहिलं नाही"
जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की, "सातारा गॅझेटच्या आधारावर पश्चिम महाराष्ट्रातील मराठेही आता आरक्षणात सामावतील. मी कधीही महाराष्ट्राला खान्देश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ अशा विभागांमध्ये न पाहता, एकसंध समाज म्हणून पाहतो. म्हणूनच हा लढा समाजाने उचलून धरला." मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांची पाठ थोपटत त्यांच्या लढ्याचं कौतुक केलं.
"विनंती मान्य झाली, आता लढा जिंकलो"
जरांगे पाटलांनी पुढे स्पष्ट केलं की, "वाशीमध्ये जी घटना घडली, ती पुन्हा घडू नये. तशी वेळ आलीच, तर मी विखे पाटलांच्या घरी जाऊन त्यांना विचारणार आहे. अभ्यासकांनी जर पुन्हा शंका उपस्थित केल्या, तर शासनाने त्यावर शुद्धीपत्रक काढावं." यावर विखे पाटलांनी तत्काळ सहमती दर्शवली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी "आता आपण जिंकलो" असं जाहीर करत उपोषणाचा शेवट केला.
मुख्यमंत्र्यांविषयी स्पष्ट भूमिका, "वैर संपेल की सुरूच राहील?"
उपोषणाच्या शेवटच्या क्षणीही मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपोषणस्थळी आले तर आमचं वैर संपेल. नाही आले तर ते वैर कायम राहील," असं थेट वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी तिन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि एकनाथ शिंदे यांना उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. विखे पाटलांनी त्यांना समजावत सांगितलं की, "आजचा निर्णय महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री लवकरच भेटतील. आता उपोषण संपवा." त्यावर जरांगे पाटलांनी हसत उत्तर दिलं. “उपोषण सुटल्यानंतर मी कुणालाही जवळ येऊ देत नाही!”
एक ऐतिहासिक लढ्याचा टप्पा पूर्ण
हे आंदोलन केवळ उपोषण नव्हतं, तर एका समाजाच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा आवाज होता. जरांगे पाटलांनी आपल्या शब्दांनी आणि कृतीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, शांततेच्या मार्गानेही इतिहास घडवता येतो.

