Maharashtra Weather : महाराष्ट्रात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत असून कोकणात उष्णतेची लाट आणि विदर्भात गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यात ‘कुठे ऊन, कुठे सरी’ अशी स्थिती कायम राहणार आहे.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानाचा अनिश्चित आणि विरोधाभासी पॅटर्न दिसत आहे. एका बाजूला उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे काही भागांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडील कोरडे वारे आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारे यामुळे राज्यात संमिश्र हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोकणात उष्णतेचा तडाखा; 8 मेपर्यंत यलो अलर्ट

कोकण पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज असून 8 मेपर्यंत मुंबईसह उपनगरांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तळ कोकणापासून मुंबईपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास वाढणार आहे.

विदर्भात तापमान 45°C पार; उष्णतेची लाट कायम

विदर्भात सध्या उष्णतेचा प्रकोप सर्वाधिक असून अकोला, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेचे चटके वाढले आहेत.

हवामान बदलामागील तांत्रिक कारणे

हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टरबन्समुळे आणि झारखंड ते तामिळनाडूपर्यंत पसरलेल्या ट्रफ लाईनमुळे वाऱ्यांची दिशा बदलली आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली नवीन हवामान प्रणालीही राज्यातील हवामानावर परिणाम करत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 6 आणि 7 मे रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, जळगाव, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या दरम्यान 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.