Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मे महिन्यात हवामानाचा लहरीपणा कायम असून काही जिल्ह्यांत उष्णतेचा कहर तर काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 4 मे रोजी 11 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानाचा अनिश्चित खेळ पाहायला मिळत आहे. एका बाजूला उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले असताना, दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 4 मे रोजी राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

11 जिल्ह्यांत पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा धोका

विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार वादळ, वीजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता असून प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

अमरावती विभागात मेघगर्जनेसह पाऊस

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याने उष्णतेसोबत पावसाचा दुहेरी परिणाम जाणवू शकतो.

कोकणात उष्णता आणि दमट वातावरण कायम

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून उकाडा जाणवणार आहे.

उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा

नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे कोरडे हवामान राहणार असून तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात 37 ते 40 अंशांदरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे.