Moshi Building Collapse Rescue Operation : पुण्यातील मोशी येथील शासकीय इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू होतं. अखेर चार दिवसांनी हे बचावकार्य संपलं आहे. या इमारतीखाली गाडून ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे : पिंपरी - चिंचवड येथील मोशी परिसरात ८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास एक प्रशासकीय इमारत कोसळली होती. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली जवळपास २० हून अधिक लोक अडकले होते. दुर्घटनेनंतर बुधवारी दुपारी २ वाजता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. हे रेस्क्यू ऑपरेशन १२ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता संपलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.

नेमकं काय घडलेलं?
मोशी इथे ही शासकीय इमारत कोसळली त्याच्या अगदी बाजूला कचऱ्याचा भलामोठा ढिग होता. गेल्या चार दिवसांपूर्वी पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा कचऱ्याचा ढिग घसरला आणि शासकीय इमारतीवर कोसळला. कचऱ्याचा ढिग कोसळल्यानंतर त्याखाली इमारतीतील अनेक कामगार अडकले गेले. त्यानंतर अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि इतर बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी कचऱ्याचा डोंगर शासकीय इमारतीवर कोसळला त्यावेळी इमारतीत २० जण होते. त्यातले ४ जण स्वत: पडले, मात्र इतर त्यात अडकले गेले. बुधवार दुपारी सुरू झालेलं हे बचावकार्य अखेर रविवारी रात्री १ वाजला संपलं. कचऱ्याच्या भल्यामोठ्या ढिगाऱ्यातून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढताना अनेक अडचणी येत होत्या. सतत कोसळला पाऊस, तसंच कचऱ्यातून येणारा विषारी वायू, मुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या.

कचऱ्याचा ढिग ज्या इमारतीवर कोसळला, ती इमारत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाची शासकीय इमारत होती. महत्त्वाची बाब म्हणजे या इमारतीला केवळ तळमजल्याला परवानगी होती, पण तरीही इमारतीवर दोन मजले चढवण्यात आले होते. त्या वरच्या दोन इमारतींना कोणी परवानगी दिली, अधिकारी किंवा कंत्राटदार यापैकी कोणाचा दोष या इमारतीसाठी होता? कचऱ्याचा इतका ढीग असतानाही त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे का लक्ष दिलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आता दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

