महामंडळाची होणार 234 कोटी रुपयांची बचत, राज्यातील 5000 एस टी बसेस एलएनजीवर धावणार

| Published : Feb 06 2024, 07:58 PM IST / Updated: Feb 06 2024, 08:27 PM IST

CMO Maharashtra

सार

पाच हजार डिझेल बसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बसेसमध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीबरोबर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

Maharashtra State Transport department : राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport) पाच हजार बसेस आता डिझेल ऐवजी द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणार असल्याने राज्य परिवहन महामंडळाची 234 कोटी रुपयांची बचत होणार आहे. पाच हजार डिझेल बसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बसेसमध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीबरोबर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

प्रदूषणात घट होण्यास मदत मिळणार

डिझेल ऐवजी एलएनजी या इंधनाच्या वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना किफायतशीर व पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे (State Transport) प्रधान सचिव पराग जैन व किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या बैठकीला उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व महाव्यवस्थापक ( भांडार व खरेदी) वैभव वाकोडे हे देखील उपस्थित होते.

एकूण सहा टप्प्यांत होणार रूपांतरण

एकूण पाच हजार डिझेल बसेसचे एलएनजी बसेसमध्ये रुपांतरण हे येत्या तीन वर्षांत एकूण सहा टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर महामंडळाची भरपूर आर्थिक बचत होण्यास मदत होईल, असे श्री. जैन यांनी सांगितले. यासाठी राज्यातील नव्वद आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (Maharashtra State Transport Department) डिझेल इंधनावर चालणारी सुमारे सोळा हजार प्रवाशी वाहने आहेत. एकूण येणाऱ्या खर्चापैकी सुमारे चौतीस टक्के खर्च हा फक्त डिझेलवर केला जातो.

हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या इंधनाची निवड केली आहे. या इंधनाच्या पुरवठयासाठी किंग्स् गॅस प्रा.लि. यांचेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. रुपांतरीत झालेल्या वाहनांची देखभाल ही रुपांतरण केलेल्या कंपनी मार्फत करण्यात येणार असुन त्याचा देखभालीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.

आणखी वाचा -

Madhya Pradesh : हरदा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना PMNRFमधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर

‘सपने नहीं हकीकत बुनते हैं...मोदी की गॅरंटी’ निवडणूक प्रचाराअंतर्गत भाजपकडून 5 व्हिडिओ लाँच Watch Video

कच्च्या तेलाची साठवण करण्याची भूमिगत जागा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भाडेतत्वावर देण्याचा ISPRLचा निर्णय