कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
Tenant Land Purchase Price In Maharashtra : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानुसार, कुळाच्या जमिनीची खरेदी किंमत शेतजमीन न्यायाधिकरणाद्वारे ठरवली जाते. ही किंमत संरक्षित कुळ, साधे कुळ या प्रकारांनुसार खंडाची रक्कम आणि इतर घटकांवर अवलंबून असते.

कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते?
Agriculture News: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम हा कायदा राज्यातील शेतकरी आणि कुळ यांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेषत: 1 एप्रिल 1957 ‘कृषक दिन’ म्हणून ओळखला जाणारा दिवस या दिवशी ज्या व्यक्ती कायदेशीररीत्या शेतजमीन कसत होती, तिला ‘कुळ’ म्हणून संरक्षण दिले गेले आहे. एखाद्या व्यक्तीला शेतजमीन न्यायाधिकरणाकडून अधिकृतपणे कुळ घोषित केल्यानंतरच जमिनीच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात होते.
खरेदी किंमत कोण ठरवते?
कुळ घोषित झाल्यानंतर कलम 32-गनुसार शेतजमीन न्यायाधिकरणच मालकाला मिळणारी खरेदी किंमत निश्चित करतं. या प्रक्रियेत कुळाचा प्रकार ‘संरक्षित कुळ’ किंवा ‘साधे कुळ’ याची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
संरक्षित कुळाच्या बाबतीत खरेदी किंमत कशी ठरते?
संरक्षित कुळांसाठी जमिनीची खरेदी किंमत खंडाच्या सहापट रकमेवर आधारित असते.
यामध्ये पुढील बाबींचा विचार केला जातो.
कुळाकडे थकित असलेला खंड
जमीन महसूल आणि उपकर
कृषक दिनापासून ते किंमत ठरवण्याच्या दिवसापर्यंतचे 4.5% व्याज
या सर्व रकमेची बेरीज करून अंतिम खरेदी किंमत ठरवली जाते.
साध्या कुळासाठी खरेदी किंमत कशी निश्चित होते?
साध्या कुळांच्या बाबतीत जमिनीची किंमत म्हणजे
जमिनीच्या आकारणीच्या किमान 20 पट ते कमाल 200 पट
विहिरी, बांधकामे, बंधारे, झाडे यांचे मूल्य
थकीत महसूल व उपकर
आणि ठरावीक कालावधीसाठी लागणारे व्याज
या सर्व घटकांची बेरीज करून खरेदी किंमत ठरवली जाते.
तथापि, कुळाने आधी दिलेली भरपाई किंवा मालकाने झाडांपासून मिळवलेले उत्पन्न असल्यास ती रक्कम वजा होते.
कुळाला किती जमीन खरेदी करता येते?
कलम 32 नुसार, कृषक दिनी जी व्यक्ती कुळ म्हणून जमीन कसत होती, तिला ती जमीन बोजामुक्त पद्धतीने खरेदी करण्याचा हक्क आहे. मात्र, कुळाला कमाल धारण मर्यादेपेक्षा जास्त जमीन खरेदी करता येत नाही.
विशेष परिस्थितीत जमीनमालकांचे संरक्षण
जमीनमालक जर अल्पवयीन, विधवा, दिव्यांग किंवा सशस्त्र दलात कार्यरत असतील, तर त्यांना काही कालावधीसाठी कुळवहिवाट थांबवण्याचा अधिकार मिळतो. ही परिस्थिती संपल्यानंतर एका वर्षाच्या आत कुळ पुन्हा खरेदी हक्क वापरू शकते.
खरेदी किंमत कशी भरायची?
कुळाला खरेदी रक्कम भरताना दोन पर्याय उपलब्ध आहेत.
एकरकमी भरणा
किंवा जास्तीत जास्त 12 वार्षिक हप्ते (4.5% व्याजासह)
रक्कम पूर्ण भरल्यानंतर न्यायाधिकरणाकडून खरेदी प्रमाणपत्र दिले जाते.
जमीन विक्री करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य
कलम 43 अंतर्गत येणाऱ्या जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे.
परवानगीशिवाय केलेला व्यवहार अवैध ठरतो.
बिगरशेतकऱ्यांसाठी नियम काय?
महाराष्ट्रात बिगर शेतकऱ्यांना शेतजमीन थेट खरेदी करता येत नाही. परंतु, अत्यल्प उत्पन्न असलेल्या व्यक्तींना काही अटींवर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जमीन खरेदीचा अधिकार दिला जातो.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम हा कायदा शेतजमिनींचे संरक्षण, कुळांचे हक्क आणि अनधिकृत जमीन व्यवहार रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. शेतजमीन, कुळ हक्क किंवा जमीन खरेदीशी संबंधित कोणताही निर्णय घेताना या कायद्याची माहिती असणे अत्यावश्यक आहे.

