देवरीनजीक राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत छत्तीसगडमधील तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सध्याच्या काळात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील आठ प्रवाशांची तब्येत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे. देवरीनजीक धोबीसराळ येथे गुरुवार मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील जखमी व मृत हे छत्तीसगड कवर्धा, खैरागड येथील आहेत. हे सर्व प्रवासी मजूर असून कामासाठी चंद्रपूरकडे जात होते.

अपघात कसा झाला? 

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात धोबीसराळ गावाजवळ झाला. या ठिकाणी डिझेल संपल्यामुळं एक ट्रक उभा होता. त्यावेळी मागून आलेल्या बसने येथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि त्यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार केले जात असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

गंभीर प्रवाशांना दाखल केलं 

हॉस्पिटलमध्ये ११ गंभीर प्रवाशांना गोंदिया शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. दोन प्रवाशांना नागपूरला उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या आठ प्रवाशांची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या बसमध्ये ५०च्या वर प्रवाशी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अपघात झाल्यानंतर येथे उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांकडून तातडीने मदत देण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन उपचारांना सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना गोंदिया येथे पुढील उपचाराला पाठवण्यात आलं.