सार

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे शिवस्वराज्य यात्रेत धडाकेबाज भाषण केले. त्यांनी आमदार रवी राणा आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी राज्यातील सत्ताधारी सरकारवरही जोरदार टीका केली.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी सोलापुरातील माढ्यात पोहोचली आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला सुरुवात झाली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबोधित केले. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी यावेळी धडाकेबाज भाषण केले. “मी जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणते”, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. तसेच सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी रवी राणा यांचा व्हिडीओ भर सभेत दाखवला.

इतके दिवस सरकार होते तेव्हा बहिणी का नाही दिसल्या? : सुप्रिया सुळे

“बहिणीला सासरी सोडणारा भाऊ असतो. पण हा भाऊ दिलेली ओवाळणी परत घेतो, असा दम देतोय. माझ्या राज्यातील बहिणीला असा दम कोणी दिला तर बहीण म्हणेल, तू पैसे परत घेऊन तर दाखव, बघते तुला. इतके दिवस सरकार होते तेव्हा बहिणी का नाही दिसल्या?”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.

‘अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आपण देणार का?’ : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी यावेळी आमदार महेश शिंदे यांचादेखील व्हिडीओ भर सभेत दाखवत निशाणा साधला. “अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आपण देणार का? आपण एखाद्याला मदत करतो ती कपाळावर लिहून गावभर सांगायची नसते”, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. “आपल्याला फक्त सत्तेसाठी बदल नकोय तर दिल्लीसमोर न झुकणारे सरकार पाहिजे. दिल्लीसमोर मुजरा करणार नाही, असे सरकार मला हवे आहे. प्रत्येक गोष्टीला हे दिल्लीसमोर झुकतात”, असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

‘अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी पैसे नाहीत, पण 18 हजार कोटींची मेट्रो करण्यासाठी पैसे’

“अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी पैसे नाहीत. पण 18 हजार कोटींची मेट्रो करण्यासाठी पैसे आहेत. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी मी जे काही करायला हवं ते करायला तयार आहे. मी सरकारवर टीका केली की माझ्या नवऱ्याला IT ची नोटीस येते. मी म्हटलं आता निवडणूक होईपर्यंत रोज नोटीस येईल त्याची तयारी ठेवा”, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'ते कायम दौरे करतात, कारण ते त्यांचे टॉनिक आहे' : सुप्रिया सुळे

“माझी तुमच्याकडे बाई म्हणून एक विनंती आहे की, मला साथ द्या. त्यासाठी मी पदर पसरते. निवडणूक दिवाळी आधी झाली तर 75 दिवस साथ द्या. दिवाळी नंतर झाली तर 90 दिवस मला द्या”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. “शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मला चिडवतात की, तुझे वडील सारखे कसे दौरे काढतात. तुझी आई त्यांना ओरडत नाही का? मी म्हटले हो ते कायम दौरे करतात. कारण ते त्यांचे टॉनिक आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“मी प्रत्येकाचा मान सन्मान कायम करेन. देशात टॅलेंटची कमी नाही. एकदा सोडून गेला तर नवीन तयार करू. आई गेली म्हणून लेकरं जगतात ना. त्यामुळे देशात टॅलेंट भरपूर आहे”, असं सुप्रिया म्हणाल्या. तसेच “गॅस सिलेंडरचे दर वाढले. त्यामुळे परत चुली पेटल्या आहेत”, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आणखी वाचा : 

अजित पवारांची स्फोटक कबुली, 'सुनेत्रांना उभे करायला नको होते'