सार

अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरुद्ध उभे करणे ही चूक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचे नसते आणि त्यावेळेस त्यांच्याकडून चूक झाली.

मुंबई: राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची लगबग सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी एक स्फोटक कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे ही एक मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचे नसते. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. त्यावेळेस केले गेले, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझे मन मला सांगते, तसे व्हायला नको होते, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी दिलेली कबुली महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

‘...तर मी राखी बांधून घ्यायला बहि‍णींकडे जरुर जाईन’

रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीत पवार घराण्यातील दोन व्यक्तींना आमनेसामने लढवण्याची चूक लक्षात आल्यानंतर तुम्ही आता रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न अजित पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहि‍णींकडे जरुर जाणार, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांचा प्रतिमासंवर्धनासाठी प्रयत्न सुरू

अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पक्षाने प्रसिद्धी आणि प्रचाराच्या बाबतीत कात टाकल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमासंवर्धनासाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीने सल्ला दिल्यानुसार अजित पवार गटाकडून सध्या राज्यातील महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यासाठी अजित पवारांकडून सुरु असलेले पिंक पॉलिटिक्स चर्चेचा विषय ठरत आहे.

सद्या अजित पवारांकडून सुरु असलेले पिंक पॉलिटिक्सची चर्चा

अजित पवार आता सार्वजनिक व्यासपीठावर फक्त गुलाबी जॅकेट परिधान करत आहेत. जनसन्मान यात्रेतील त्यांच्या सर्व गाड्या गुलाबी रंगाने रंगवण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी कालच धुळ्यात शेतावरील बांधावर जाऊन त्याठिकाणी काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला होता. एकूणच अजित पवार यांच्याकडून महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बायकोला रिंगणात उतरवणे, ही चूक होती, ही अजित पवार यांची कबुली अजितदादांच्या प्रतिमासंवर्धनासाठी वापरण्यात आलेल्या रणनीतीचाच एक भाग आहे का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

आणखी वाचा :

लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीसांचा खास संवाद, जाणून घ्या