- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात 12 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार, पुणे ते विदर्भातपर्यंतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात 12 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार, पुणे ते विदर्भातपर्यंतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : मुंबईत सध्या पावसाने गणेशोत्सवानंतर विश्रांती घेतली आहे. पण येत्या 12 सप्टेंबरनंतर राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईसह कोकण व मराठवाड्यात केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाची विश्रांती
गणेशोत्सव आणि विसर्जनादरम्यान मुंबईत अधूनमधून झालेल्या जोरदार सरींमुळे भटकंतीवर परिणाम झाला होता. विसर्जनाच्या दिवशीही पावसाने हजेरी लावली होती. मात्र, या आठवड्यात महामुंबई परिसरासह कोकणात पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पावसाची अलीकडची नोंद
गेल्या काही दिवसांत उत्तर मुंबई तसेच डहाणू भागात पावसाचा जोर अधिक होता. शुक्रवार ते शनिवार आणि शनिवार ते रविवार या दोन दिवसांत सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३४.२ आणि ३६.७ मिमी, तर डहाणू येथे ३५.२ आणि ११०.३ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र येत्या आठवड्यात पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांत शुक्रवारपर्यंत फक्त मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. दक्षिण कोकणात (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) देखील तसाच पाऊस पडेल.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती
कोकण विभाग वगळता मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत ११ सप्टेंबरपर्यंत पावसाला काहीशी उघडीप राहील. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही.
१२ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर
निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांच्या मते, १२ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल. त्यावेळी विदर्भ, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, मुंबईसह कोकण व मराठवाड्यात केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम सरी पडतील.
सरासरी पावसातील तफावत
मुंबईतील कुलाबा केंद्रावर अजूनही सरासरीपेक्षा १५६ मिमी पाऊस कमी आहे. तर सांताक्रूझ येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे सरासरीपेक्षा ५३४ मिमी पाऊस अधिक झाला आहे. राज्यभर पाहता १ जून ते ८ सप्टेंबरदरम्यान सातारा, सोलापूर, हिंगोली, जालना, अकोला, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची तूट आहे.

