Maharashtra Rain Update : राज्यात आता मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain Update : जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र आता मान्सूनने महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले असून अनेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः 3 जुलै ते 7 जुलैदरम्यान काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, 3 जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. 7 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुणे, मुंबई, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
IMD चा अंदाज
नागपूर प्रादेशिक वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात 3 जुलै ते 7 जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जूनमध्ये मोठी पावसाची तूट
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहिले. विशेषतः विदर्भात जवळपास 50 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. या तुटीची भरपाई येत्या काही दिवसांच्या पावसातून होईल, अशी अपेक्षा आहे. पण अतरी संपूर्ण तूट भरून निघणे कठीण असल्याचे हवामान विभागाचे मत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या दृष्टीने आगामी पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
परतीच्या पावसाबाबतही अंदाज
पंजाबराव डख यांनी यंदा परतीचा मान्सूनही राज्यात जोरदार सक्रिय राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. आगामी काळात जुलै महिन्यातील पावसाची परिस्थिती खरीप हंगामासाठी निर्णायक ठरेल असेही त्यांनी सांगितले आहे.


