Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज राज्यातील 23 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. पुढील काही तासांत मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस

मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पवई आणि आसपासच्या परिसरात धुवांधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.

Scroll to load tweet…

23 जिल्ह्यांना यलो, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने आज राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.पुढील काही तासांत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणात पावसाचा धुमाकूळ

कोकण विभागात सध्या मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. अनेक भागांत संततधार आणि अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेर्डी येथे तब्बल 197 मिलिमीटर, तर धामनंद येथे 192 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत तुलनेने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाड्यातही यलो अलर्ट

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.