- Home
- Maharashtra
- Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, 21 जिल्ह्यांना यलो आणि 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, 21 जिल्ह्यांना यलो आणि 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Weather Alert: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २५ सप्टेंबर रोजी २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर विदर्भ, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे कमबॅक
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाचे कमबॅक होत असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील तब्बल 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून त्याचा परिणाम कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांवर दिसून येणार आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts North Konkan, Madhya Maharashtra and Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या pic.twitter.com/AFzwVtmf5j— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 24, 2025
मुंबई आणि कोकण विभाग
मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवून यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पाचही जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. मात्र या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही.
मराठवाडा
आठपैकी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भात पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याचा अंदाज आहे.
ऑरेंज अलर्ट: यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली
यलो अलर्ट: बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया
विशेष म्हणजे, पूर्व विदर्भातील काही भागांत हवामान विभागाने अतिवृष्टीची शक्यता ही दर्शवली आहे.
पुढील दिवसांत काय?
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने त्याचा परिणाम राज्यातील बहुतांश भागांत दिसेल.
नागरिकांनी सावधगिरी बाळगून सूचनांचे पालन करावे
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरासारखी परिस्थिती किंवा शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

