Ahilyanagar Dattatray Bharane Tour: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीपूर्वी शंभर टक्के नुकसानभरपाई थेट खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले.

अहिल्यानगर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने मदतीचा धीर दिला आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की, “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई थेट खात्यात जमा केली जाईल. सरकार कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.”

शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करताना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलासा दिला. या दौऱ्यात आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार संग्राम जगताप तसेच महसूल, कृषी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

७ लाख ४९ हजार एकर शेती बाधित

भरणे यांनी माहिती दिली की जिल्ह्यात आजवर तब्बल ७.४९ लाख एकर शेती अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे. त्यापैकी फक्त मागील महिन्यातच ६.३४ लाख एकर शेतीचं नुकसान झालं आहे. “एकाही शेतकऱ्याच्या शेतीतील एक गुंठाही भाग पंचनाम्याविना राहणार नाही”, असं ते स्पष्ट म्हणाले.

ई-पीक पाहणीला दिलासा

शेतकऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच विमा कंपन्यांना मदत वाटपाची प्रक्रिया गतीमान करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.

घर गमावलेल्यांसाठी तातडीची मदत

ज्या शेतकऱ्यांचे घर, शेत किंवा छप्पर पावसाने वाहून गेले आहे, अशांना प्रशासनाकडून तातडीची मदत, किराणा आणि गृहोपयोगी साहित्य पुरविण्याचे आदेशही कृषीमंत्र्यांनी दिले आहेत.

अतिक्रमणावर कारवाईचा इशारा

अतिवृष्टीमुळे ओढे आणि नाल्यांवर निर्माण झालेल्या अतिक्रमणावरही मंत्री भरणे यांनी कडक भूमिका घेतली. “शासन गंभीर आहे, ही अतिक्रमणे लवकरच हटवली जातील”, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांचा संताप आणि मंत्र्यांची तगडी झाप

दरम्यान, बदनापूर तालुक्यातील पाहणीवेळी संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या उदासीन कामकाजावर संताप व्यक्त करत कृषीमंत्र्यांना प्रश्न विचारले. यावर भरणे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारला आणि त्यांना चांगलेच झापल्याची घटना घडली.

अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचं नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने दिवाळीपूर्वी संपूर्ण नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन देऊन दिलासा दिला आहे. आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा प्रशासनाने गतीने काम पूर्ण करून त्या प्रत्यक्षात येण्याकडे आहेत.