मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली. यावेळी त्यांनी ६५ मिमी पावसाची अट न ठेवता मदत देणार असल्याची मोठी घोषणा दिले.
धाराशिव: महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहचवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर मंत्री पंकजा मुंडे या देखील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या नुकसान झालेल्या भागांना भेट देतील.
अजित पवार सकाळीच शेतकऱ्याच्या बांधावर हजर
अजित पवार आज सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याच दिसून आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब परिसरात झालेल्या अतिवृष्टीची सध्या ते पाहणी करत आहेत. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कर्माला तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्याचं दिसून आलं आहे. परंडा तालुक्यातील देवगाव, भूम तालुक्यातील वालवड आणि वाशी तालुक्यातील पारगाव येथे पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी यावेळी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. निधीची कोणतीही चिंता नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल आणि मदत देताना ६५ मिमी पावसाची अट ठेवणार नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांकडून कांदा आणि इतर पिकांची माहिती घेतली.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करू
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते सर्व आम्ही करू. आधी आम्ही पाहणी करत आहोत आणि तुमच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले. मंत्री पंकजा मुंडे या शेतकऱ्यांच्या आज गाठीभेटी घेणार आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन त्या गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.


