लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीसांचा खास संवाद, जाणून घ्या

| Published : Aug 13 2024, 11:38 AM IST / Updated: Aug 13 2024, 11:40 AM IST

Maharashtra, NCP, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Governor Bhagat Singh Kosari, Prime Minister Narendra Modi

सार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राखी पौर्णिमेला राज्यातील बहिणींशी संवाद साधणार आहेत. हा संवाद 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' या उपक्रमांतर्गत होणार आहे.

मुंबई : महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूवात केली. सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचे नाव चर्चेत आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच लाडकी बहिण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने विशेष अभियान हाती घेतले आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राज्याच्या लाडक्या बहि‍णींशी थेट संवाद साधणार आहे. या बाबतची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे.

राखी पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बहिणींशी संवाद

स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना आणि उपक्रमांच्याद्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष आणि सरकारद्वारे आम्ही करत आहोत. येत्या राखी पौर्णिमाला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे "लाडक्या बहिणींचा देवाभाऊ" या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे. सोबतच राज्यातील सर्व माता-भगिनींना विनंती करत सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन देखील या पोस्टमधून केले आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांना विशेषतः भाजप महिला मोर्चाला विनंती केली आहे की, या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असेही या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

 

 

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अशातच आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार, याची आतुरता लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचे सांगितले. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे. असं देखील सांगितले. पण आज अजित पवारांनी मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटले. अजित पवारांच्या वक्तव्याने काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. पण काही क्षणातच अजित पवारांना जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले.

आणखी वाचा : 

रक्षाबंधनावर कोणत्या राशींवर पडणार शुभ योगांचा प्रभाव?, जाणून घ्या