लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. वृद्धापकाळाने दीपक टिळक यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.

पुणे – 'केसरी'चे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे पणतू डॉ. दीपक जयंत टिळक यांचे निधन झाले आहे. बुधवारी (१६ जुलै) पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. डॉ. दीपक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या निधनाने पुणे आणि महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. टिळक कुटुंबाच्या सामाजिक परंपरेचा वारसा त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने पुढे नेला. काही काळ ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते.याशिवाय डॉ. टिळक यांना २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे जपानी भाषेच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात सुपुत्र आणि काँग्रेस नेते रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन आज सकाळी ८ ते ११ या वेळेत टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

कौटुंबिक वारसा आणि सामाजिक पृष्ठभूमी

डॉ. दीपक टिळक हे गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये मोलाचे योगदान देणारे स्व. जयंतराव टिळक यांचे पुत्र होते. जयंतराव टिळक हे राज्यसभेचे १२ वर्षे सदस्य आणि १६ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राहिले होते. डॉ. दीपक टिळक यांची आई स्व. इंदुताई टिळक या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 'सेवा सदन' आणि 'हुजूर पागा'सारख्या शैक्षणिक संस्थांशी त्यांचे योगदान जोडलेले होते. त्यामुळे दीपक टिळक यांना बालपणापासूनच सामाजिक कार्यात रस होता. डॉ. टिळक यांचे सुपुत्र रोहित टिळक यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पुण्याच्या कसबा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाने एक अनुभवी, शांत, आणि विचारवंत व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पुणे आणि टिळक कुटुंबासाठी ही मोठी दुःखद घटना ठरली आहे.