Shahshikant Shinde New President NCP SP: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई : गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषवणारे जयंत पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी, साताऱ्याचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण बैठकीत जयंत पाटील यांनी निरोपाचे भाषण केले, त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान आता शशिकांत शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

जयंत पाटलांच्या यशस्वी कारकिर्दीचा समारोप

जुलै २०१८ पासून जुलै २०२५ पर्यंत असे सलग सात वर्षे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात बदलाची मागणी जोर धरू लागली होती, मात्र शरद पवारांनी लोकसभा निवडणुका जयंत पाटलांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील हे स्पष्ट केले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मिळालेल्या जोरदार धक्क्यामुळे पक्षाची सदस्यसंख्या विशीपार नेण्यात त्यांना अपयश आले, आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिकच तीव्र झाली होती.

शशिकांत शिंदे यांच्यासमोरील आव्हाने

शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. माथाडी कामगार संघटनांमध्ये त्यांचे मोठे वजन असून, नवी मुंबईच्या राजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कोरेगाव विधानसभेचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मराठा प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. शरद पवारांशी त्यांचे निकटचे संबंध हे त्यांच्या निवडीमागे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे.

शशिकांत शिंदे यांच्यासमोरील पहिली आणि मोठी चाचणी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. राष्ट्रवादीत फूट पडल्याने पक्ष संघटना दुभंगली आहे आणि स्थानिक पातळीवर पक्षाचे म्हणावे असे संघटन नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांत त्यांना गावोगावी जाऊन पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. तसेच, राज्यात विभागवार आढावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांची गणिते जुळवणे हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे आव्हान असेल.

याव्यतिरिक्त, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाला लागलेली गळती रोखणे हे एक प्रमुख आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे. गळती रोखण्यासोबतच, नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देऊन पक्षसंघटन पुन्हा उभारण्याचे कठीण काम त्यांना करावे लागेल. हे सर्व करत असताना पक्षांतर्गत विरोधकांनाही वेळोवेळी शांत ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.