बीड जिल्ह्यातील गेवराईत OBC नेते लक्ष्मण हाके, राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. हाके यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी लावलेल्या बॅनर्सवरून हा वाद उफाळला.
बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात OBC नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यातील राजकीय वाद चिघळला असून, दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट आणि गोंधळ उडाला. यावेळी लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आणि गाडीच्या पुढील काचा फोडण्यात आल्या. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
घटना कशी घडली?
गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके या चौकात पोहोचले होते. याच ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील जमले होते. दोन्ही गट आमनेसामने आले आणि परिस्थिती चिघळली. यावेळी दगडफेक, चप्पल भिरकावणे, आणि तोंडाने शिवीगाळ झाली. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि गाडीची पुढील काच फोडली. पोलिसांनी तत्काळ लक्ष्मण हाके यांना सुरक्षितपणे बीडकडे रवाना केले.
वादाचं कारण काय?
गेवराई शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून वाद उफाळला. या बॅनर्सवर आमदार विजयसिंह पंडित यांचे फोटो झळकत होते. यावर लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिकरित्या आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद वाढला.
विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया
"लक्ष्मण हाके हे समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्याविरोधात खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. आम्ही त्यावर संयम राखला, पण त्यांच्या चिथावणीखोर विधानांमुळे आमचे कार्यकर्ते संतप्त झाले," असं आमदार पंडित म्हणाले. त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, "जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यामुळे समाजात तेढ निर्माण होतो, हे हास्यास्पद आहे."
सध्या काय स्थिती?
गेवराई शहरातील शिवाजी महाराज चौकात अजूनही दोन्ही गटांचे कार्यकर्ते तणावपूर्ण वातावरणात उपस्थित आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्यातील राजकीय वाद आता थेट रस्त्यावर उतरला आहे. या प्रकारामुळे गेवराईत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आणि पोलीस सतर्क झाले आहेत.


