Pravin Darekar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप भाजपने जरांगे पाटील यांच्यावर केला.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमधील वाद चांगलाच पेटला आहे. बीडमध्ये झालेल्या एका सभेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटलांना थेट इशारा दिला आहे.

"आम्ही तुम्हाला शिवीगाळ करू का?"

प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले की, “महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अशा प्रकारे बोलणे ही विकृती आहे. आम्ही त्यांना ‘जरांगे’ किंवा ‘दादा’ म्हणायचो. पण तुम्ही कसली औलाद आहात? आम्ही तुम्हाला ‘चिंधीचोर’ किंवा ‘हराXXX’ म्हणू का? तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा. नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही,” असा कडक इशारा दरेकर यांनी दिला.

जरांगे पाटलांनी आंदोलनापुरते बोलावे

दरेकर पुढे म्हणाले, “कोणताही सुसंस्कृत माणूस असे बोलू शकणार नाही. जरांगे यांनी फक्त आंदोलन करावे, पण असे काही बोलू नये. मराठा समाजाच्या प्रश्नांसोबत फितुरी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहनशील आहेत आणि ते चर्चा करायला तयार आहेत.”

नितेश राणे यांचाही कठोर इशारा

दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनीही मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “जे खरे मराठा आहेत, ते कधीही कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच महिलांचा आदर केला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी, पण देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरण्याची हिंमत कोणी करत असेल, तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे.”

या सर्व पार्श्वभूमीवर, आता मनोज जरांगे पाटील या आरोपांवर काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.