कोकण किनारपट्टी भागात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवमान खात्याने व्यक्त केला आहे. याशिवाय किनारपट्टीला उंच लाटांचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे.

Kokan Rain Alert : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून, कोकण परिसरात पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. विशेषत: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा धोका असल्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिला आहे. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे आणि किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील २४ तासांत राज्यात पालघर (१९.८ मिमी), रत्नागिरी (१६.३ मिमी), चंद्रपूर (१२.३ मिमी), ठाणे (११.१ मिमी), रायगड (९.४ मिमी) या जिल्ह्यांमध्ये पावसाची लक्षणीय नोंद झाली आहे. अशा स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्वाचे रस्ते आणि पूल सुस्थितीत राहावेत यासाठी दुरुस्ती आणि देखभाल मोहीम वेगाने राबवली आहे.

दरम्यान, जूनच्या मध्यानंतर मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने नद्या, नाले, ओढे आणि धरणं प्रवाहित केली आहेत. त्यामुळे धरणक्षेत्र आणि नदीकाठच्या भागांतील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही कोकणात मान्सूनने सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी मिळालेली नाही. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे.

रत्नागिरी व रायगडमध्ये पावसामुळे दोन दुर्दैवी घटना

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गावात 48 वर्षांचे एक इसम नदी ओलांडताना सायकलसह वाहून गेले. जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या प्रवाहात ते वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून, दापोली प्रशासनाने युद्धपातळीवर शोध मोहिम सुरू केली आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरदोले गावातविजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोशन कचरू कालेकर (वय २५ वर्ष) हा युवक आपल्या शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सध्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नदी–नाल्यांना पूर आला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे देखील सुरू आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.