असाच प्रकार स्वारगेट बलात्कार प्रकरणातही दिसून आला होता. पीडित तरुणी आरोपीच्या संपर्कात होती. ती स्वतःहून बसमध्ये गेली होती. त्यानंतर दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, असा दावा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकिलांनी केला होता.
कोलकाता / मुंबई - कोलकात्यातील एका नामांकित लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले असताना, आता या खटल्याला नवे गूढ वळण मिळाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे प्रकरणात मोठा वाद निर्माण झाला आहे. आरोपीने बलात्कार केला तर त्याचा शरीरावर लव्ह बाईट्स कसे काय, असा सवाल वकिलांनी विचारला आहे. असाच प्रकार स्वारगेट बलात्कार प्रकरणातही दिसून आला होता. पीडित तरुणी आरोपीच्या संपर्कात होती. ती स्वतःहून बसमध्ये गेली होती. त्यानंतर दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, असा दावा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकिलांनी केला होता.
कोलकाता बलात्कार प्रकरणातील घटनाक्रम : पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार…
२४ वर्षीय विधी विद्यार्थिनीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जून रोजी संध्याकाळी ७:३० ते रात्री १०:५० दरम्यान, तीन आरोपींनी तिला लॉ कॉलेजच्या कॅम्पस परिसरात गाठून गार्ड रूममध्ये नेले. तिथे तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात माजी विद्यार्थी मोनोजित मिश्रा (३१) तसेच दोन सध्या शिकणारे विद्यार्थी जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) यांना अटक करण्यात आली आहे.
मोनोजित मिश्रा : तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा नेता
मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) सक्रिय कार्यकर्ता असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी तपासात उघड केले आहे. त्याच्या विरोधात कोलकात्यातील कालीघाट, कसबा, अलीपूर, टॉलीगंज व हरिदेवपूर पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.
पोलिसांनी दिली माहिती : शरीरावर ओरखडे, पीडितेचा प्रतिकार
सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, मेडिकल तपासणीमध्ये मुख्य आरोपी मोनोजित मिश्राच्या शरीरावर ओरखडे असल्याचे स्पष्ट दिसून आले, जे पीडितेने प्रतिकार केल्याचे निदर्शक आहेत.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद : ‘जर बलात्कार होता, तर लव्ह बाईट्स कसे?’
प्रकरणाला कलाटणी मिळाली जेव्हा मोनोजितचे वकील राजू गांगुली यांनी न्यायालयात असा सवाल उपस्थित केला की, “सरकारी वकिलांनी ओरखड्यांचा उल्लेख केला, परंतु आरोपीच्या शरीरावर आढळलेल्या ‘लव्ह बाईट्स’चा उल्लेख का केला नाही? जर हा बलात्कार होता, तर लव्ह बाईट्स असणे हेच सिद्ध करते की दोघांमध्ये परस्पर संमती होती!” या युक्तिवादामुळे पोलिस तपास, वैद्यकीय पुरावे आणि पीडितेच्या जबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
पोलिस कोठडी आणि अधिक तपास
न्यायालयाने मोनोजित मिश्रा याला ८ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, गार्ड रूममध्ये ही घटना घडल्यामुळे कॉलेज गार्डलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची मोबाईल लोकेशन्स, सीसीटीव्ही फुटेज आणि मेडिकल तपासणीचे अहवाल जमा करण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका बंद असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला होता. पोलिसांनी मोठी शोध मोहिम राबवून या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात झालेल्या युक्तिवादादरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी हा बलात्कार नसून संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, पीडितेच्या वकिलांनी हा दावा खोटा असल्याचे सांगून जाणून बूजून पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात येत असल्याचा दावा केला होता.


