जोधपूर स्वीट्समध्ये काम करणाऱ्या भगाराम नावाच्या कामगाराने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानात येऊन पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी भगारामला विचारले, “कुठे राहतोस?”
मुंबई - ठाण्यातील प्रसिद्ध ‘जोधपूर स्वीट्स’ दुकानात एका दुकानमालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (एमएनएस) कार्यकर्त्यांनी केवळ मराठी भाषेबाबत प्रश्न विचारल्याने जोरदार मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात भाषेच्या मुद्द्यावरुन वादाला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.
काय घडलं नेमकं?
जोधपूर स्वीट्समध्ये काम करणाऱ्या भगाराम नावाच्या कामगाराने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानात येऊन पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी भगारामला विचारले, “कुठे राहतोस?” त्याने उत्तर दिलं, “महाराष्ट्रात.” तेव्हा कार्यकर्त्यांनी त्याला सांगितले, “मग मराठी बोलावी लागेल.” भगाराम म्हणाला,“मी त्यांना सांगितलं की आम्ही सर्व भाषा बोलतो. तेव्हा त्यांनी धमकी दिली की ‘तुला आता बघून घेतो, दुकान फोडतो.’ त्यानंतर ते दुकानमालकाकडे गेले आणि वाद वाढला.”
पहिल्यांदाच असा अनुभव आला
राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून आलेले भगाराम मागील १५ वर्षांपासून मुंबईत राहतात आणि विविध मराठी लोकांबरोबर कामही केले आहे. मात्र असे कधीच घडले नव्हते, असे ते म्हणाले. “आम्ही गरजेनुसार मराठी बोलतो. पण आजवर कुणी असं जबरदस्ती केल्याचं पाहिलं नव्हतं,” असे भगाराम म्हणाले.
‘मराठी का बोलायची?’ विचारल्यावर मारहाण
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात मनसेचे कार्यकर्ते दुकानमालकाला म्हणताना दिसत आहेत की, “तू विचारतोस, मराठी का बोलावी लागते? मग आमच्याकडे मदतीसाठी का आलास? आता तुझं दुकान इथे चालू देणार नाही.” जेव्हा दुकानमालकाने म्हटलं की, “मग मराठी शिकवा ना,” तेव्हा एका कार्यकर्त्याने उत्तर दिलं, “हो, तेच बोलायचं. पण 'का शिकावी लागते?' असं बोलायचं नाही. हा महाराष्ट्र आहे, इथली भाषा कोणती?” दुकानमालकाने “सर्व भाषा” असा उत्तर दिल्यावर त्याला पुन्हा पुन्हा थप्पड मारल्याचं दिसतं.
पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.घटना रविवारी रात्री घडली असून, मनसेकडून सध्या राज्यात मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या मागणीला जोर दिला जात आहे. दुकानं, बँका आणि व्यावसायिक ठिकाणी मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
त्रिभाषा धोरणालाही मनसेचा विरोध
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाच्या विरोधातही मोहीम चालवली आहे. केंद्र सरकारच्या नवी शैक्षणिक धोरणात (NEP) त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी होत असतानाच मनसेने मराठीच्या बाजूने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाषेच्या नावावर जबरदस्ती योग्य का?
या प्रकारामुळे महाराष्ट्रातील भाषिक सहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला मराठीला योग्य मान-सन्मान मिळायला हवा, अशी मागणी आहे, तर दुसरीकडे भाषेच्या नावावर दुकान फोडणे, मारहाण करणे, जबरदस्तीने भाषा शिकवण्याचा प्रयत्न करणे, हे लोकशाहीच्या चौकटीत बसत नाही, असे जाणकार सांगत आहेत.
मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी, यासंदर्भातील वाद निवळण्यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष, आणि समाज यांना एकत्र येऊन चर्चेने मार्ग काढावा लागणार आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


