कोल्हापूरमध्ये गणपतीच्या आगमनावेळी एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
मुंबई : कोल्हापूर शहरात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाचण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. राजारामपुरी परिसरात घडलेल्या या घटनेत वाजीद जमादार नावाचा तरुण जखमी झाला आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद घटना
मिळालेल्या माहितीनुसार, वाजीद जमादार याने आपल्या मित्रांना नाचण्यासाठी आग्रह केला होता. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. अज्ञात आरोपीने जमादारवर वार केले असून, हा प्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जखमी रुग्णालयात दाखल, पोलिसांचा तपास सुरू
हल्ल्यानंतर जखमी वाजीद जमादार याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
मिरवणुकीत गोंधळ, शांततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे काही काळ मिरवणुकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राजारामपुरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींना लवकरच अटक होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सण-उत्सवाच्या काळात अशा घटनांमुळे शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


