पुण्यातील थेरगाव येथे २२ वर्षीय तरुणीवर तलाक नाकारल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाला. आरोपींनी दुचाकीवरून येऊन तरुणीवर ब्लेडने वार केले.
पुणे- पुण्यातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येताना दिसून येत आहेत. तलाक का देत नाही म्हणत २२ वर्षीय तरूणीला जीवे मारण्याचा भरसकाळी प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे पुणे शहर हादरून गेलं आहे. पुण्यातील थेरगाव येथील एम. एम. चौकामध्ये ही घटना घडली आहे. ब्लेडने वार करून खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न तरुणाकडून करण्यात आला होता.
नेमकी काय घटना घडली?
सलमान रमजान शेख आणि हुजेफा आबेद शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी नाणेकर चाळ, भारतनगर, पिंपरी येथील २२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिने याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादी महिला कामावर असताना तिच्यावर हल्ला केला होता.
आरोपी दुचाकीवरून आले असताना त्यांनी अचानक तरुणीवर हल्ला केला. सलमान या व्यक्तीने महिलेला तू तलाक का देत नाहीस असं विचारून तिच्या मानेवर ब्लेडने वार केले होते. त्या महिलेच्या डोक्यावर, मानेवर वार करून तिला जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तीकडून करण्यात आला होता. या घटनेमुळे पुणे शहर ढवळून निघालं आहे.
