पंढरपूर वारी करण्याची आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी लेखकाने सायकल वारी केली. मित्रांच्या साथीने आणि PCMC Runners ग्रुपच्या मदतीने तीन महिने तयारी केल्यानंतर वारीला सुरुवात केली. प्रवासात अनेक अडचणी आल्या पण विठ्ठलाच्या कृपेने वारी पूर्ण झाली.
पंढरपूरची वारी एकदा तरी करावी अशी माझ्या आईची इच्छा होती.. तिने 5 वर्षापूर्वी मला बोलून दाखवली होती आणि माझ्या डोक्यात विचार घुमू लागले होते पण एक विचार मनी आला की आपण नोकरदार , एवढ्या दिवसांची सुट्टी शक्य नाही म्हणून काही दिवसांसाठी का होईना मनाला मुरड घातली. 3 वर्षापूर्वी माझ्या फिटनेस प्रवासाला सुरुवात झाली तेव्हा, सायकल वारी , रन वारी पण असते हे ऐकताच माझ्या डोक्यात वारीचे विचार परत घोळू लागले आणि गेल्या वर्षी विचार पक्का केला की जून 2025 साली काहीही झालं तरी वारी करायचीच ..झाल तर मग इथूनच मी माझ्या सायकलिंग प्रवासाला सुरुवात केली..जेव्हा आमच्या ग्रूप मध्ये मी म्हणालो काय रे वारी करायची का तेव्हा लगेचच 4 लोक तयार झाले. मग सगळ्यांचे एकच विचार चालू झाले.. सायकल कोणती घ्यावी? प्रॅक्टिस कसं कराव? एका दिवसात वारी पूर्ण करता येइल का ?? वगैरे वगैरे ... इथून सुरुवात होती पण आई ला दिलेले शब्द मनात आले आणि सगळे विचार बाजूला सारून सुरुवात केली.
सर्वात आधी सायकल प्रॅक्टिस करून केली सुरुवात
आधी साधी मित्राची सायकल आणली एक दोनदा प्रॅक्टिस केली. नंतर मग बायकोने प्रेमाने वाढदिवसाला सायकल (माझी हिरकणी ) मला गिफ्ट केली आणि मग काय केली सुरुवात प्रॅक्टिस ला. गेल्या तीन वर्षापासून माझ्या कडे एक सगळ्यात अप्रतिम आणि मोठी गोष्ट आहे ती म्हणजे माझा PCMC Runners चा ग्रुप..इथे फक्त एकच गोष्ट होते ती म्हणजे फिटनेस ... इथे फक्त आपले टार्गेट सांगायचे की तुम्हाला काय करायचे आहे त्याप्रमाणे तुम्हाला सगळी माहिती- ट्रेनिंग प्लान करून देतात आणि करवून पण घेतात. फी फक्त तुमचे सातत्य आणि समर्पण...
मार्च महिन्यापासून 1000 किमी सायकल प्रॅक्टिस, स्त्रेंथ ट्रेनिंग, योगा, रनिंग करून आजच्या वारी ची तयारी झाली होती.. हे करत असताना अडचणी खुप होत्या हे सांगायला नको कारण आय टी ची नोकरी म्हणजे जाण्याचा येण्याचा टाईम नसतो. हे सगळ पाहत तयारी करणे म्हणजे तारेवरची कसरतच. पण म्हणतात ना ईच्छा तेथे मार्ग आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे.... आणि स्वप्न पूर्ण करायला तर आपल्याला आवडतातच. एक आठवडा आधी वारीचे किट घेतले तेव्हा माझा उत्साह गगनात मावत नव्हता.. पण अडचणी अजून संपल्या नव्हत्या. एक ट्विस्ट बाकी होता.. रविवारी रात्री झोपेत मान अकडली आणि टेन्शन वाढलं ...आत्ता काय करायचे...पण लगेचच फिजिओथेरपी चालू केली, ग्रुपमध्ये कळताच डॉक्टर पंकज यांनी औषधे चालू करून त्यावर उपाय केले. हे करत असताना माझ्या ग्रूप मधील प्रत्येक जण मला प्रेरणा देत होता की "अरे तुझ्यासाठीच वारीचा घाट घातलाय. तुला बरं व्हावच लागेल."
मला समजले की हे फक्त माझं स्वप्न राहीले नाही तर आता सगळ्यांचं झालं आहे. सगळ्यांच्या इच्छाशक्तीमूळे बऱ्यापैकी 6 जून रात्रीपर्यंत माझी मान सरळ झाली.. आदल्या दिवशी सगळी तयारी झाली होती. माझी हिरकणी तयार होती .. कोणताही मोठा इव्हेंट असला की जीवाची घालमेल चालू होते. माझेही तेच झाले.... कसे होईल... काय होईल... या विचारांनी झोप लागणार नव्हतीच पण उगाच अंथरुणावर पडून 1 वाजण्याची वाट पाहत होतो..शेवटी एकदाचा गजर वाजला आणि एका क्षणांत तो बंद करून मी अंघोळीला पळालो... आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या रात्रीची अंघोळ केली असेल मी... सगळा सरंजाम अंगावर चढवून 1:30 वाजता बायकोपुढे उभा... मी म्हणालो एक फोटो तरी काढ
आम्ही पंढरपूरला निघालो
घरातून निघालो आणि ठरलेल्या ठिकाणी आम्ही सगळेजण एक एक करत भेटलो. सगळ्यांचा उत्साह एकदम गगनाला भिडला होता. आणि हे होणारच होते. मागील साडेतीन महिन्यापासून तयारी करताना फक्त या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो.. सगळे भेटून एक फोटो काढला आणि चला राम कृष्ण हरी..जय हरी विठ्ठल म्हणत सायकल वारीला सुरुवात केली.. सुरवातीला एकदम निवांत चालू होते. पहिला टप्पा आम्ही ठरवला होता की पुण्यातून लवकर बाहेर पडायचे.. आता सगळे सायकलच्या लाईटच्या मिणमिणत्या प्रकाशात मागे पुढे चाललो होतो. कारण आजचा दिवस खूप मोठा जाणार होता हे सगळ्यांनाच माहित होते.. अनुभवी रघुनाथ आमच्यासोबत होता.. निगडी ते कासारवाडी या टप्प्यात आम्हाला वारी ला जाणारी लोक भेटत होती सगळ्यांना राम कृष्ण हरी म्हणत आम्ही पुढे चाललो होतो .. दापोडी जवळ येताच प्रशांत च्या सायकल चे मडगार्ड निघाले त्याने तसेच ते बॅग मध्ये ठेवले आणि आम्ही पुढे निघालो.. आता पहिला टप्पा म्हणजे पहिला हायड्रेशन पॉईंट हडपसर येथे पोहचलो आमचे आता 27 किमी झाले होते तिथे सगळ्या पाणी बॉटल भरून पुढे प्रवास चालू केला .. आज सगळे सोबत होतो.
प्रशांत थोडा मागे राहत होता पण त्याला सोबत घेऊन आम्ही चाललो होतो आम्ही ठरवले होते. दोघा दोघांनी मागे पुढे एकमेकांना मोटिव्हेट करत सोबत रहायचे.. 42 किमी झाले आणि पहिला ब्रेकफास्ट पॉईंट आला.. मस्त गरम उपिट आणि चहा घेतला सायकल ची हवा चेक केली ...आता सोलापूर हायवे चालू झाला होता.. इथून आम्ही पुढे सरसावलो असता बघेल तिकडे सायकल वरून वारीचे लोक दिसायला लागले होते.. कोणाचे पंक्चर झालेले चाक ते दुरुस्त करत होते तर कोणी एकदम सुसाट पुढे जात होते.. ते पाहून उत्साह येत होता..
यावर्षी लहान मुलं महिलावर्ग जास्ती होता याचे खूप अप्रूप वाटत होते.. सगळ्यांचा चेहऱ्यावर फक्त एकच उत्साह दिसत होता. अजूनही आम्ही सगळे सोबत होतो. बाजूने वाऱ्याच्या वेगाने जाणारी वाहने , बाजूचे लहान मोठे खड्डे चुकवत आम्ही पुढे जात होतो. पण जस जस पुढे जायला लागलो तसा तसा प्रशांत संतोष आणि सम्राट मागे पडायला लागले. रघुनाथ अनुभवी होता त्यामुळे तो प्रशांत सोबत होता. खरं तर प्रशांत ने ब्रेकफास्ट पॉईंट ला सांगितले होते की त्याची तब्बेत ठीक नव्हती पण केवळ वारी करायची या इच्छाशक्ती च्या जोरावर तो आला होता .. आता त्याचे आणि आमचे स्पीड मॅच होत नव्हते. शेवटी प्रशांतच रघुनाथ ला म्हणाला तुम्ही पुढे व्हा मी येतो हळू हळू .. त्रास झाला तर ट्रक मध्ये बसून ये असे त्याला सांगून रघुनाथ पुढे सरसावला खरे, पण मनाला पटत नव्हते. पण लांबचा पल्ला गाठायचा होता नंतर ऊन होणार होते त्यामुळे तो पुढे निघाला...
पुढे येत असताना काळंकुट्ट पावसाळी आभाळ दिसत होते .. कुरकुंभ चा घाट चालू झाला होता. घाट म्हणजे मोठा चढ होता. सायकलचे स्पीड आता कमी झाले होते आणि वातावरणाकडे पाहून जोरात पाऊस पडण्याची भिती वाटत होती. आता 95 किमी झाले होते आणि आम्ही दुसऱ्या ब्रेकफास्ट पॉईंट च्या प्रतीक्षेत होतो. शेवटी ब्रेकफास्ट पॉईंट जवळ थांबलो. इथे रघुनाथ ने आम्हाला गाठले. प्रशांत संतोष आणि सम्राट मागून येतील असे सांगितले. खर तर आमच्या ही मनाला पटत नव्हते त्याना मागे सोडून जाणे पण दुसरा काही मार्ग दिसत नव्हता. शेवटी ठरवले की आपण चौघे पुढे जाऊन जेवणाच्या ठिकाणी त्यांची वाट बघायची.. इथे टाळ मृदुंग घेऊन लोक कीर्तन करत होते. ते पाहून हुरूप अजूनच वाढला ..
आता सकाळपासून जो वरुण देव थांबला होता त्याने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली. पाऊस खुप जोरात चालू झाला. थोडावेळ थांबलो पण अजून थांबणे योग्य वाटत नव्हते म्हणून सगळ्यांनी ठरवले आता पुढे निघाले पाहिजे.. पाऊस डोक्यावर येऊ नये म्हणून तजवीज केली आणि आम्ही 4 जण पुढे निघालो .. जसं जसं पुढे जायला निघालो तसा पाऊस कमी झाला. आता हळू हळू सूर्यदेवांचे दर्शन व्हायला लागले होते. एकदम मनमोहक वातावरण झाले होते पळसदेव च्या पाट्या दिसायला लागल्या होत्या. उजनी धरण दिसायला लागले होते .. उजनी धरणाच्या पुलावर आम्ही थांबून पाणी पिलो आणि थोडे फोटोसेशन केले. इथे सुद्धा आम्ही प्रशांत ची आठवण काढली. फोन करून विचारले तेव्हा तो ब्रेकफास्ट पॉईंट का आला होता..आम्ही पुन्हा एकदा सायकल चेक केली आणि पुढे सरसावलो. आता थोडी गरमी जाणवायला लागली होती पण मागे पुढे मस्ती करत चढ उतारावर कमी जास्त स्पीड करत विठ्ठलाचे नाव घेत चाललो होतो..
जेवण करून मामेभावाची घेतली भेट
जाताना लहान मुलांना महिलावर्गाला प्रोत्साहन देत राम कृष्ण हरी म्हणत पुढे जात होतो.. एखादा खुप पुढे गेला की तो थांबून सगळ्यांसोबत जायचे असा ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही चाललो होतो. अधून मधून घरी फोन करून अपडेट देत होतो.. आता 150 किमी झाले होते आणि उन्हाचा कहर चालू झाला .. अजून जेवणाचा पॉईंट लांब होता त्यामुळे अधे मधे थांबून पाणी पित पुढे चाललो होतो.. रघुनाथ आम्हाला प्रत्येक जागेची माहिती देत होता .. एकदाचा जेवणाचा पॉईंट आला आणि थोडावेळकरीता का होईना सर्वांनीच हुश्श केले .. भूक लागली होती .. सायकली एका बाजूला लाऊन एन्ट्री करून आम्ही जेवणासाठी आलो. मस्त गरमागरम जेवण करून हॉल मध्ये आराम करण्यासाठी गेलो. इथे मागचे पुढचे लोक भेटत होते अनुभव सांगत होते.. कोणी थकले होते.. कुणाचे काय हे ऐकत मी शूज काढून निवांत बसलो होतो. काहीजण वामकुक्षी घेत होते.. मला झोप आली नाही त्यामुळे मुंबई वरून आलेले माझे मामे भाऊ यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो.
15 मिनिटे झाली आणि रघुनाथ म्हणाला चला मंडळी.. लगेचच बाहेर आलो, सरंजाम चढवला, सायकल ची हवा चेक केली थोडा चेन ला ऑइलिंगकेला आणि निघालो.. पुढे गेलो तर एक अपघात झाला होता. ही महिला सायकल वारी मधीलच एक होती. तिथे थांबून काही मदत लागतीय का हे पाहिले. शेवटी आम्ही सगळे आज एकच होतो पण जास्त काही नव्हते हे ऐकून बरे वाटले. आता उन्हाचा पारा वाढला होता ..आता 5-5 किमी ला पाणी लागत होते.. रघुनाथ म्हणत होता कुठेतरी थांबून शेजारच्या शेतात पाणी असेल तर अंगावर पाणी घेऊन पुढे जाऊ .. विठ्ठलाच्या कृपेने एका ठिकाणी वारीचे आयोजकच पाण्याचे पंप आणून सर्वांना मस्त भिजवत होते. इथे आम्ही थांबलो आणि आम्ही थंडगार पाणी भरून घेतले. डोकं भिजवले, थंडगार ताक पिले .. आता 170 किमी झाले होते. अजून बराच पल्ला बाकी होता.. पण त्यावेळी सुद्धा तोच हुरूप होता उत्साह होता..
इथून पुढे निघालो आणि जवळपास 180 किमीच्या दरम्यान हायड्रेशन पॉईंट आला इथे निंबूज् आणि संत्री ची सोय होती. इथे परत एकदा हायड्रेशन घेऊन आम्ही पुढे निघालो. आता टेंभुर्णी फाटा टार्गेट ठेवले आणि थोड्या वेळात तिथे पोहचलो.. उन्हामुळे पाणी लगेच गरम होत होते आणि उन्हाचा खूपच त्रास जाणवत होता.. समोर रस्त्यावरचा बोर्ड पाहिला तर पंढरपूर फक्त 40 किमी राहिले होते. 190 किमी चा टप्पा 3 वाजताच पूर्ण झाला होता .. जवळपास आम्हाला पुणे सोडून 10 तास झाले होते...
आम्ही पंढरपुरात पोहचलो
रघुनाथ आम्हाला म्हणाला, आता इथून पुढे खरी जिकिर करावी लागणार आहे, कारण उन्हासोबत सिंगल लेन रस्ता, येणारा उलटा वारा आणि पूर्ण चढ यांच्यासोबत युद्ध होते.. खरतर आता फक्त एकच ध्यास होता विठ्ठलाच्या दारात जाण्याचा ..प्रत्येक पॅडल मारताना आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत पुढे जात होतो.. एक एक किलोमीटर पुढे सरसावत होतो.. विठ्ठलाच्या नामात काय ताकद आहे ते इथे कळले. खरतर आम्ही थकलो होतो पण इच्छाशक्ती आणि भक्तीचा जोर खूप मोठा होता आणि त्याच जोरावर आम्ही हे अवघड 35 किमी पूर्ण केले. आता पंढरपूरमध्ये प्रवेश केला तोच एका भल्या मोठ्या विठ्ठल मूर्तीचे दर्शन झाले. इथे आम्ही प्रशांतची आठवण काढत तो कुठे पोहोचला आहे ते बघितले. प्रशांतची जिद्द होती की काहीही झाले तरी वारी पूर्ण करायचीच. विठ्ठलाचा पण आशीर्वाद होताच. इथे थोडे फोटो काढले आणि शेवटचे पाच किमी अंतर पार करण्यासाठी निघालो..
आणि ...आणि... इंद्रायणीचा पूल लागला....आणि अचानक तोंडातून गेले ..भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।पाहे रात्रीं दिवस वाट तुझी.. खुप भावनिक झालो होतो... आता कधी एकदा पोहोचतोय असं झालं होतं. सायकल चा वेग वाढला होता आणि एकदाचं पंढरपुरातील शिवाजी चौकात पोहचलो .. इथे पोहचल्यावर दर्शनासाठी आलेले आजूबाजूचे भाविक विचारत होते कुठून आला ,कधी निघाला होता... जेव्हा त्यांना कळत होते की सकाळी निघालो होतो तेव्हा आश्चर्याने पुन्हा तेच प्रश्न विचारत होते..आमचे मन मात्र कधीच विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचले होते. इथे आम्हाला चैतन्य महाराज भेटले. त्यांनी आपुलकीने चौकशी केली आणि सोबत फोटो सुद्धा काढला.. आता आम्ही गर्दीतून वाट काढत नामदेव पायरीच्या दिशेने निघालो होतो.. मी खूप जास्त भावनिक झालो होतो .. मला हळू हळू माझ्या मागील 3.5 महिन्या च्या तयारीतील प्रत्येक क्षण आठवत होता.
आम्ही सगळेच जण एकमेकांचे अभिनंदन करत होतो.. 7 तारखेला रात्री 1.30 वाजता चालू केलेला प्रवास आता संपला होता आणि आम्ही त्या विठुराया च्या दारात उभे होतो.. उभे राहून बाहेरूनच दोन्ही हात वर करून पाया पडताना डोळ्यात पाणी होतं. एवढ्या गर्दीत पण आम्हाला बाकीच्यांनी जागा दिली होती कारण आम्ही आज विठ्ठलाचे वारकरी होतो.. या क्षणाची जवळपास मी 5 वर्ष वाट पाहिली होती.. आईला दिलेला शब्द मी पूर्ण केला होता.. सगळेच खूप आनंदी होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद होता ..समाधान होतं. याच साठी केला होता अट्टाहास असा तो क्षण होता. हे सगळ करत असताना आम्हा प्रत्येकाच्या मनात एकच सल होती की जीवाभावाचे मित्र - प्रशांत संतोष आणि सम्राट आमच्या सोबत नव्हते .. पण तेही इथे लवकरच पोहोचतील हा विश्वास होता.
गावी माउलींच्या दर्शनाला निघालो
इथून आम्ही भक्त निवास च्या दिशेने वाट काढत निघालो ..भक्त निवास ला IAS (वारी आयोजक) ने उत्तम सोय केली होती. प्रत्येक वारकऱ्याला मेडल आणि टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. नंतर आम्ही खोली मध्ये आलो. प्रशांत ला फोन करून कुठे आहे विचारले. तो अजून 9 किमी मागे होता.. त्याची वाट पाहत आम्ही खोली मध्ये बसलो होतो. एकदाचा प्रशांत आला आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला ..एकमेकांची गळाभेट झाली ..खरतर या वारी प्रवासात प्रशांत ची सोबत आम्ही खुप मिस केली होती पण आमच्या सांगलीच्या वाघाने केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही वारी पूर्ण केली होती.. त्याचा पूर्ण अनुभव ऐकण्यासारखा होता.. माझी वारी अजून पूर्ण झाली नव्हती मला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन माझ्या गावी लोणंद ला माझ्या आई वडिलांची भेट घ्यायची होती.. त्या दिवशी अंथरुणावर पडल्याक्षणी झोप लागली ती दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता जाग आली ..सकाळी सगळे मित्र पुण्याचा दिशेने जाण्यास निघाले होते. मी मात्र दर्शन करून गावी जाणार होतो.
माझा एक जिवाभावाचा मित्र रोहित श्रीवास्तव पुण्यावरून फक्त आणि फक्त पांडुरंगाचे दर्शन आणि मला नेण्यासाठी येणार होता. तो दुसऱ्यादिवशी रविवारी माझा अजून एक मित्र चैतन्य याला घेऊन पंढरपुरात दाखल झाला. आज मला पांडुरंगाचे दर्शन समोरून घ्यायचे होते त्यामुळे आम्ही वेळ न दवडता दर्शन रांगेमधे उभे राहिलो. गर्दी पाहता ४ तास लाइन मध्ये उभे राहण्याच्या तयारीने आम्ही गेलो. आणि तसेच झाले तब्बल 4.5 तास थांबल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पोहचलो .. आणि एक अभंग आठवला घेई घेई वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || तुम्ही घ्या रे डोळे सुख | पहा विठोबाचे मुख || २ || तुम्ही ऐका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ || मना तेथे धाव घेई | राहे विठोबाचे पायी || ४ || रुपी गुंतले लोचन | पायी स्थिरावले मन || ५ || देहभाव हरपला | तुज पाहता विठ्ठला || ६ || तुका म्हणे जीवा | नको सांडू या केशवा || ७ ||
खरच एवढ्या दिवसांची इच्छा पूर्ण होत होती .. मंदिरातील पुजाऱ्याने विचारले तुम्ही सायकल वारी वाले का ..घ्या व्यवस्थित दर्शन घ्या.. आणि मी माझे डोके त्या पांडुरंगाच्या चरणी ठेवले. सोबत दोन हार आणि एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली होती ती पण विठ्ठलाच्या पायावर टेकवली ..माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. तसेच पाणावल्या डोळ्यांनी बाहेर पडलो आणि रखुमाई चे दर्शन घेतले ..
प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार
आता परतीचा प्रवास गावी ..घरी पोहचलो. आता मला घरच्या विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घ्यायचे होते. दोघांना उभे केले नेलेले हर गळ्यात घातले आणि विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती हातात ठेवली आणि म्हणालो आईसाहेब तुम्हाला दिलेला शब्द मी पूर्ण केला ..आई म्हणाली रोहित आज माझे जीवन सार्थक झाले ..हा न विसरणारा मी क्षण भरलेल्या डोळ्यात साठवला आणि आता कुठे माझी सायकल वारी पूर्ण झाली.. तुकोबा राय म्हणून गेले रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ॥३॥ सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
प्रत्येकाने अनुभव घ्यावा अशी ही वारी ..माझे सोबती...माझे मित्र प्रशांत, विशाल ,रघुनाथ, डॉक्टर पंकज , संतोष, .. प्रत्येक क्षणी मदतीला येणारा , प्रत्येक इव्हेंट ची माहिती आमच्यापर्यंत पोहचवणारा रोहित जयसिंघानी, तयारी करून घेणारे आणि ट्रेनिंग देताना बारकाईने माहिती देणारे आमचे दीपक सर आणि बाकी संपूर्ण PCMC Runners ची टीम ..या पूर्ण प्रवासात मला साथ दिली तो माझा मित्र रोहित , माझी बायको आणि माझा मुलगा अर्णव, आणि सगळ्यात महत्वाचे IAS (वारी ऑर्गनायझर) चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. याच सर्वांमुळे आज मी माझी स्वप्नपूर्ती करू शकलो.. अशी ही यावर्षीची वारी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली.. आता वारी चुकायची नाही. हे नक्कीच..
लेखक आणि सायकलस्वार - भास्कर ठुबे
