सार
मुंबई: महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातील एका समारंभात आज संध्याकाळी ४ वाजता होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील, अशी बातमी पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने शुक्रवारी पीटीआयला सांगितले की, ३०-३२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे.
जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात
५ डिसेंबर रोजी मुंबईत एका भव्य समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात.
बावनकुळे यांनी घेतली शिंदे-पवार यांची भेट
शुक्रवारी प्रदेश भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. अजित पवार यांच्या दक्षिण मुंबईतील देवगिरी बंगल्यावर जोरदार चर्चा झाली, जिथे त्यांनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात २८८ पैकी २३० जागा जिंकून सत्ता मिळवली. सूत्रांनी पीटीआयला सांगितले की भाजपला २०-२१ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर सेनेला ११-१२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ९-१० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज दुपारी ४ नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. यानंतर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल.
आणखी वाचा-
मुंबईत बेस्ट बसच्या अपघातात आणखी एक बळी, अपघातांची मालिका कायम
राहुल गांधींनी आजी इंदिरा गांधींकडून ऐकलेली सावरकरची गोष्ट सांगितली