सार

मनुस्मृती हा भारताचा अधिकृत दस्तऐवज असल्याचा सावरकरांचा दावा होता आणि भाजप आजही तोच विचार घेऊन चालला आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.

दिल्ली: संसदेतील घटनात्मक चर्चेत भाग घेत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सावरकरांवर जोरदार टीका केली. घटनेची प्रत उंचावत भाषण करताना राहुल गांधींनी मनुस्मृतीचाही उल्लेख करत सावरकर आणि भाजपवर टीका केली. नवीन भारताचा आधारस्तंभ हा संविधान आहे हे सांगत राहुल गांधींनी, भारताचे काहीही घटनेत नाही असे सावरकर म्हणायचे, असे सांगत टीकेला सुरुवात केली. लहानपणी मी आजीला सावरकरांबद्दल विचारले होते, असे राहुल गांधींनी संसदेत सांगितले. सावरकर हे ब्रिटिशांची माफी मागणारे होते, असे इंदिरा गांधींनी मला सांगितले होते, असेही राहुल गांधी म्हणाले.

महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर यांचे विचार घटनेत आहेत, असे सांगत राहुल गांधींनी, मनुस्मृती हा भारताचा अधिकृत दस्तऐवज असल्याचा सावरकरांचा दावा होता आणि भाजप आजही तोच विचार घेऊन चालला आहे, अशी टीका केली. आजही भाजपचा कायदा मनुस्मृती आहे, घटना नाही. सावरकरांवर टीका केल्यास मला दोषी ठरवले जाईल. देशाला मागे नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे आणि तेथे मनुस्मृतीचे पालन केले जाते, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधींची सावरकर टीका ही ढोंगीपणाची आहे, असा पलटवार भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. इंदिरा गांधींनी सावरकर ट्रस्टला पैसे दिले होते आणि इंदिरा गांधी माहिती आणि प्रसारण मंत्री असताना सरकारने सावरकरांवर माहितीपट तयार केला होता, असे निशिकांत दुबे म्हणाले. त्यामुळे राहुल गांधींनी आजीची माफी मागावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली. यापूर्वी अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींच्या भाषणाची टीका केली होती. राहुल गांधींना घटनेबद्दल काहीही माहिती नाही, असे अनुराग ठाकूर म्हणाले.