Dharashiv Flood : पूरग्रस्त धाराशिव जिल्ह्यात प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. .

Dharashiv Flood : धाराशिव जिल्हा भीषण पुराशी झुंज देत असताना प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात रंगल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा तुळजापूर येथील नवरात्र महोत्सवात डान्स करतानाचा व्हिडिओ २४ सप्टेंबर रोजीचा असल्याचे समजते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या संकटाशी थट्टा?

पूरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे महसूल अधिकारी नाचगाण्यात रमल्याचे चित्र धक्कादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “शेतकऱ्यांना आधार देण्याची वेळ आली आहे, पण अधिकारी मात्र डान्स करत आहेत,” अशा शब्दांत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे.

नवरात्र महोत्सवातील प्रचंड खर्चावर प्रश्नचिन्ह

यापूर्वीच नवरात्र महोत्सवासाठी तब्बल साडेआठ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. पूरग्रस्तांना मदतीची गरज असताना एवढा पैसा सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करणं योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या वेदना कमी करण्यासाठी संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे. “हा महोत्सव रद्द करून तो निधी पूरग्रस्तांसाठी वापरायला हवा होता,” असे त्यांनी म्हटले. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की जिल्हाधिकारी रात्री उशिरा पूरग्रस्तांशी संपर्क साधत होते, त्यामुळे या घटनेकडे एकतर्फी पाहता कामा नये. तरीसुद्धा शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून त्यांच्याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.