Dasara Melava : महाराष्ट्रात आज दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात पाच दसरा मेळावे होणार आहे. याच दसऱ्या मेळाव्यांकडे राज्यातील संपूर्ण जनतेचे लक्ष लागून राहिले असून कोण काय बोलणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Dasara Melava : राज्यात आज विजयादशमीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष आणि समाजघटकांकडून दसरा मेळावे आयोजित केले गेले आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यासह बंजारा समाजाचाही मेळावा मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे. या सर्व मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचा पारंपरिक दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. फुटीनंतरचा हा महत्त्वाचा मेळावा असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोणत्या घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीक आणि संभाव्य राजकीय युतीबाबत उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.

Scroll to load tweet…

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एग्झिबिशन सेंटरमध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे. पावसामुळे आझाद मैदानातील कार्यक्रम रद्द करून स्थळ बदलण्यात आले आहे. शिंदे गटाकडून शेतकरी, विकास आणि निवडणूक विषयांवर मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.

Scroll to load tweet…

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. भगवान बाबांचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा करून पंकजा मुंडे साधारण दुपारी १२ वाजता जनतेला संबोधित करतील. राज्यभरातून आलेले मुंडे समर्थक या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा

नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. रुग्णालयातून थेट ॲम्बुलन्सने गडावर दाखल झाल्यानंतर जरांगे पाटील महंत शिवाजी महाराजांसोबत व्यासपीठावर येणार आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बंजारा समाजाचा दसरा मेळावा

पोहरादेवी येथे बंजारा समाजाचा दसरा मेळावा दुपारी २ वाजता होणार आहे. एस.टी. आरक्षणासाठी लढा देणाऱ्या समाजाकडून या मेळाव्यात पुढील रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींसह बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.