सार

नागपुरात एका दाम्पत्याने २६ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष साजरा केल्यानंतर आत्महत्या केली. जेरिल डॅमसन ऑस्कर मॉनक्रीफ आणि ॲनी जेरील मॉनक्रीफ यांनी लग्नाच्या पोशाखात सजून आपल्या घरीच आत्महत्या केली.

नागपूर: मुल नसलेल्या एका दाम्पत्याने आपल्या २६व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मित्र-परिवारासोबत मध्यरात्रीपर्यंत जल्लोष केला, आनंद साजरा केला. त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाच्या पोशाखात सजून मंगळवारी पहाटे त्यांच्या घरीच आत्महत्या केली. ही घटना जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टिन नगरमध्ये घडली.

जेरील डॅमसन ऑस्कर मॉनक्रीफ (वय ५४) व ॲनी जेरील मॉनक्रीफ (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या दांपत्याची नावे आहेत. जेरिल यांचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी अ‍ॅनी दिवाणखान्यातल्या पलंगावर मृतावस्थेत आढळली. २६ वर्षांपूर्वी परिधान केलेल्या लग्नाच्या पोशाखात असलेल्या अ‍ॅनीच्या शरीरावर पांढऱ्या कपड्याने झाकून त्यावर फुलं टाकलेली होती. पोलिसांनी सांगितलं की, जेरिलने कदाचित अ‍ॅनीला आधी आपलं आयुष्य संपवू दिलं असावं. त्यानंतर, जेरिलने स्वतः स्कार्फने गळफास लावून आत्महत्या केली.

नोकरी नसल्याने आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती

जेरिल हे अनेक नामांकित हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम करत होते, पण महामारीच्या काळात त्यांनी नोकरी सोडली आणि नंतर परतले नाहीत. जेरीलची नोकरी गेल्याने तो बेरोजगार होता. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. तर तर अ‍ॅनी गृहिणी होती. याच नैराश्यातून या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुहेरी आत्महत्येच्या प्रकारामुळे मंगळवारी मार्टिननगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या मुल नसलेल्या दाम्पत्याने आपल्या सोशल मीडियावर निरोप संदेश पोस्ट केला आणि दोन आत्महत्या पत्रांसह स्टॅम्प पेपरवर एक अनौपचारिक मृत्यूपत्रही अपलोड केले आहे.

आणखी वाचा-  नववधूचा धक्कादायक कट: विषप्रयोग आणि फसवणूक

मृत्यूला कोणालाही जबाबदार धरले नाही

अ‍ॅनीने, जी या घटनेपूर्वी व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी पुढे आली होती. कुटुंबीयांना आपल्या नातेवाईकांच्या मुलांची काळजी घेण्याची विनंती केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ती भावनिकरित्या निरोप घेऊन निघून गेली. आत्महत्येची दोन पत्रे सापडली, ज्यात त्यांनी त्यांच्या टोकाच्या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरले नाही आणि ज्येष्ठांनी त्यांच्या संपत्तीचे योग्य वाटप करावे, अशी विनंती केली आहे. त्यांच्या या निर्णयामागे त्यांचा स्वतःचा विचार असल्याचे दिसत होते, पण आत्महत्येचे खरे कारण अस्पष्ट राहिले. मध्यरात्री बरोबर १२ वाजता त्यांनी आनंदाने लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापला, तेव्हा त्यांच्या मनात नक्की काय चालले होते, हे कोणीच समजू शकले नाही.

कुटुंबीयांनी सांगितले की, अ‍ॅनीने सकाळी ५.४७ वाजता सोशल मीडियावर अपडेट केलेले स्टेटस एका शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी अ‍ॅनीच्या आईला याबाबत कळवले. नंतर त्या महिलेने इतर नातेवाईकांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ मॉनक्रीफ दाम्पत्याच्या घरी धाव घेतली. मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांना दोघेही मृत अवस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांना तातडीने कळवण्यात आले.

आणखी वाचा- ऑनर किलिंग: चुलत भावाने बहिणीला डोंगरावरून ढकलले; मुलीचा जागीच मृत्यू

“नातेवाईकांनी जेरिलचा मृतदेह खाली उतरवून स्वयंपाकघराच्या जमिनीवर ठेवला. तर पत्नीचा मृतदेह दिवाणखान्यात होता,” असे जरीपटका पोलिसांनी सांगितले. हा प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा प्रकार आहे आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा कट असल्याचा संशय नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

मायो रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी जरीपटका कॅथलिक स्मशानभूमीत त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांना एकाच शवपेटीत हातात हात घालून दफन करण्यात आले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस त्यांच्या मोबाइल फोनचे विश्लेषण करण्यासाठी त्यांना प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवतील.