सार

उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्थानकातच गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

BJP MLA Firing :  उल्हासनगरमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये वाद झाल्याची घटना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) घडली. भाजप आमदार गणपत गायकवाड(Ganpat Gaikwad)  यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. 

रिपोर्ट्सनुसार, उल्हासनगरमध्ये गोळीबार करण्यात आलेल्या प्रकरणावरुन भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी सहा राउंड फायर केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली आहे.

नक्की काय घडले?
पोलिसांनी या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये एका जमिनीवरुन वाद झाला. याची तक्रार करण्यासाठी दोघेही पोलीस स्थानकात पोहोचले. यावेळी पोलीस स्थानकात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. यामध्ये महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक जमखी झाले आहेत.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणात SIT ची स्थापन
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर केलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नीलेश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
उल्हासगनर गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले की, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर या घटनेसंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये वडेट्टीवार यांनी म्हटले की, "इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे.भाजपवाल्यांचे बॉस "सागर" बंगल्यावर आणि शिंदे गटाचे "बॉस" वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता!"

गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामधील वाद काय?
गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामधील वाद एका जमिनीसंदर्भातील आहे. जो दीर्घकाळापासून सुरू आहे. शुक्रवारी दोघांमध्ये पुन्हा याच जमिनीवरुन वाद होत तो पोलीस स्थानकापर्यंत पोहोचला गेला. पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये बाचाबाची झाली. 

वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. असे सांगितले जातेय की, पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले असून अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्याने एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा : 

Rajya Sabha Elections 2024 : 15 राज्यातील 56 जागांवर येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार, पाहा महाराष्ट्रात किती जागा

गुंतवणूकीवर उत्तम परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेसह काहीजणांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक, नवी मुंबईतील घटना

नागपूरमध्ये RSS मुख्यालयाच्या आसपास ड्रोन उडवण्यास बंदी, या कारणास्तव घेतलाय निर्णय