Badlapur Case: 'हा विषय लावून धरा', राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

| Published : Aug 20 2024, 03:49 PM IST / Updated: Aug 20 2024, 04:06 PM IST

Javed Akhtar Raj Thackeray

सार

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर आंदोलन केले असून राज ठाकरे यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

मुंबई: बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागला. यामुळे बदलापूरच्या नागरिकांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेत सकाळपासून रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे रुळांवरुन बाजूला होण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागरिकांकडून बदलापूरमध्ये आंदोलन सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन महाराष्ट्र सैनिकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत विषय लावून धरावा, असे आवाहन केले आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे बदलापूरच्या घटनेबाबत म्हणाले की," बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले? एका बाजूला कायद्याचे राज्य म्हणायचे, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या."

नेमकं प्रकरण काय?

बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार 12 ऑगस्ट रोजी झाला होता. या प्रकरणातील आरोपी शाळेत 1 ऑगस्ट रोजी कामावर कंत्राटी पद्धतीने रुजू झाला होता. आरोपी अक्षय शिंदे याने लहान मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने माफीनामा सादर केला असून मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये दिरंगाई झाल्याचे समोर आले. पीडित मुलीच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला 12 तास वाट पाहायला लागली. यानंतर मंगळवारी बदलापूरमध्ये नागरिक आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मुद्दा लावून धरला. आता आरोपींना शिक्षा होईपर्यंत हा विषय लावून धरा, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

आणखी वाचा : 

बदलापूरमध्ये संतप्त जमाव आक्रमक, शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकावर दगडफेक