Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कोणतीही क्लीन चिट मिळणार नाही, असे स्पष्ट करत सखोल तपासाचे आश्वासन दिले. विरोधकांनी सीडीआर तपासाची मागणी करत सरकारवर टीका केली.
Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत मोठा गदारोळ झाला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, दोषींना कोणतीही ‘क्लीन चिट’ दिली जाणार नाही आणि कुणालाही सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. तसेच या प्रकरणावर मंगळवारी सविस्तर निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा आक्रमक पवित्रा, सीडीआर तपासाची मागणी
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. त्यांनी या प्रकरणात 100 हून अधिक व्हिडीओ क्लिप्स समोर आल्याचा दावा केला. या क्लिप्समध्ये राजकीय नेते, IAS-IPS अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करत संबंधित सर्वांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपासण्याची मागणी करण्यात आली. यानंतर भास्कर जाधव आणि नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली.
“प्रकरण अत्यंत गंभीर”, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
सभागृहात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीर म्हटले. आध्यात्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड होत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सक्रिय कारवाई सुरू केली असून, सुरुवातीला घाबरणाऱ्या महिला आता पुढे येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आधीपासूनच कारवाईची तयारी
ही कारवाई अचानक नसून पूर्वनियोजित असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आरोपीच्या अटकेपूर्वीच 10 मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातील तक्रारीच्या आधारे ‘लुकआउट सर्क्युलर’ (LOC) जारी करण्यात आले होते. त्यामुळे आरोपीला देशाबाहेर पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
‘ब्रेन वॉशिंग’ करून महिलांचा गैरवापर
“माझ्यात विशेष शक्ती आहे” असे सांगून महिलांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांचा गैरवापर करण्यात आला, अशी धक्कादायक माहितीही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. या प्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर येत असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहात गोंधळ; अध्यक्षांकडून तपासाची माहिती
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरच पुढील कामकाज सुरू झाले.


