Ashok Kharat Case : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात नव्याने दाखल झालेल्या FIR मध्ये अघोरी कृत्ये, आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओ क्लिप्समुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
Ashok Kharat Case : नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, नव्या FIR मध्ये फिर्यादीकडून करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.
अघोरी विधीच्या नावाखाली फसवणूक
नव्या FIRनुसार, अशोक खरात हा धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली अघोरी कृत्ये करत होता. बाजारातून स्वस्तात मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करून त्यांना ‘मंत्र’ केल्याचा दावा करत तो भाविकांकडून 10 हजार ते 1 लाख रुपये उकळत असल्याचा आरोप आहे.
नकली साप-वाघ वापरून भीतीचे वातावरण
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, खरात बाजारातून प्लास्टिकचे साप, कापडी वाघ आणि इतर बनावट साहित्य आणून मंदिरात ठेवत असे. मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात हे साहित्य वापरून तो भाविकांना घाबरवत असे आणि अघोरी विधी दाखवत पैशांची उकळपट्टी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ब्लॅक मनी व्हाईट करण्याचे आरोप
FIRमध्ये आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. खरातने ‘ईशानेश्वर महादेव मंदिर शिवनिका संस्थान’ या नावाने ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या बँक खात्यांचा वापर करून तो मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत होता. तसेच ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी या खात्यांचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
महिलांवर अत्याचार आणि धमक्या
सर्वात गंभीर आरोप म्हणजे महिलांवरील अत्याचाराचे आहेत. FIR नुसार, अशोक खरात महिलांना धार्मिक विधीच्या नावाखाली गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार करत होता. त्यानंतर पीडितांना जीवे मारण्याची धमकी देत तो त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हिडिओ क्लिप्समुळे वाढली गंभीरता
या प्रकरणात पोलिसांच्या हाती अनेक व्हिडिओ क्लिप्स लागल्या असून, त्यातून खरातचे कृत्य उघड होत असल्याचे समोर आले आहे. या पुराव्यांच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे जात असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.


