Ashadhi Wari Palkhi Ceremony : माऊलींचे शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान, अलंकापुरीत वारकऱ्यांनी मांदियाळी

| Published : Jun 28 2024, 10:51 AM IST

alankapuri

सार

Ashadhi Wari Palkhi Ceremony : आषाढी पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली आहे.

 

Ashadhi Wari Palkhi Ceremony : यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी शनिवारी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर अलंकापुरीत वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी देहूनगरीतून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने अनेक वारकरी आळंदीतून देहूकडे मार्गस्थ होत आहेत. अलंकापुरीही माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले आहेत. परिणामी आळंदी भाविकांनी गजबजून निघाली आहे. आळंदीत दाखल होताच प्रथमदर्शी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत. सद्यस्थितीत दर्शनरांग इंद्रायणी पलीकडे जाऊन पोहचली आहे. मात्र अनेक जण थेट मंदिरातून मुखदर्शनाचा लाभ घेत आहेत.

महाद्वारातून भाविकांना प्रवेश बंद

वाढती गर्दी लक्षात घेऊन शुक्रवारपासून महाद्वारातून वारकरी तसेच भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे. दरम्यान टेम्पो, ट्रकमधून वारकरी भाविकांचे आगमन होत आहेत. तर काही वारकरी पायी चालत आळंदीत दाखल होत आहेत. भविकांच्या आगमनाने इंद्रायणी नदी तीर गजबजून निघाला आहे. इंद्रायणी तीरावर वासुदेवाच्या हरीनामाचा गजर ऐकू येत आहे. तर काही भाविक वारीची आठवण जतन करण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावर आपल्या कुटंबियांसमवेत मोबाईलमध्ये छायाचित्रण करत असताना दिसून येत होते.

वारकऱ्यांना माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची आतुरता

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी शहरात अनेक हार प्रसाद फुलांची व वारकरी साहित्य वस्तूंची दुकाने सजलेली दिसून येत आहेत. मंदिरामधील दर्शनबारीत वारकरी भाविक 'ज्ञानोबा माऊलीचा' जयघोष करत आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये क्षणभर विसवून हरीनामाचा जप करताना दिसत आहेत. भाविकांना आता माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची आतुरता लागली आहे.

 आणखी वाचा

shadhi Wari Palkhi Ceremony : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात, ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टॉवरद्वारे ठेवणार वॉच