सार

Ashadhi Wari Palkhi Ceremony : पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून काही पोलीस कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होणार आहेत.

Ashadhi Wari Palkhi Ceremony : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रविवारी 30 जूनला शहरात दाखल होणार आहेत. 30 जून आणि 1 जुलैला दोन्ही पालख्या मुक्कामी राहणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असून शहरात सुमारे 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत.

श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी प्रस्थान होणार आहे. तर, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान होणार आहे. रविवारी दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होतील. पालखी सोहळा रविवारी आणि सोमवारी शहरात मुक्कामी असणार असून मंगळवारी पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून सुमारे 5 हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.

रविवारी पालखीसोबत लाखो भाविक शहरात मुक्कामी असणार असून मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी वॉच टॉवर, सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पालख्यांचे शहरात आगमन होण्यापासून पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

असा असेल बंदोबस्त

अप्पर पोलीस आयुक्त 2

पोलीस उपायुक्त 10

सहायक पोलीस आयुक्त 20

पोलीस निरीक्षक 101

सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक 343

पोलीस कर्मचारी 3 हजार 693

होमगार्ड 800

राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी

गुन्हे शाखेची खास पथके वारकऱ्यांच्या वेशात

पालखी सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात. सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. यावेळी काही कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होणार आहेत.

आणखी वाचा

Maharashtra Weather Update : राज्यात आज कुठं कुठं कोसळणार पाऊस?, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज