सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे रुमाल घेण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाय घसरून दरीत पडला. कोल्हापूरहून आलेला हा युवक मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता.

Amboli Accident: पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी ट्रेकर्स आणि पर्यटक मंडळींची गर्दी आपल्याला दिसून येत असते. धोकादायक ठिकाणी गेल्यावर खबरदारी न घेतल्यास जीवावर बेतण्याची जास्त शक्यता असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी युवक रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल घ्यायला गेला आणि तेथेच पाय घसरून पडला. येथील प्रत्यक्षदर्शी लोकांच्या म्हणण्यानुसार त्याचा पाय घसरून दरीत पडला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव 

पोलिसांनी या घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली आहे. वाऱ्याच्या वेगामुळे तरुण दरीत पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेलिंगच्या जवळच उलट्या दिशेने वाहणारा धबधबा असून येथेच ही घटना घडली. मुलगा कोल्हापुरातून मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता आणि ते मित्र थांबून पावसाचा आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेत होते.

रेलिंगच्या पलीकडे गेल्यामुळं घडली दुर्घटना 

रेलिंगच्या पलीकडे युवक गेल्यामुळं हि दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी इथं आल्यानंतर दरीत पडलेल्या व्यक्तीच्या मित्रांची चौकशी केली. युवक नेमका दरीत कसा पडला, त्यावेळी काय झालं याची माहिती काढली जात आहे. तो रुमाल काढायला गेलेला असताना दरीत पडल्याची माहिती आहे. घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.