BMC Elections : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. नागरिकांशी संवाद साधून विकासकामे, रस्ते, पाणी, वीज यांसारख्या प्रश्नांवर चर्चा केली.
BMC Elections : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीबाबत अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. "प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारी करतो, त्याचप्रमाणे आम्हीदेखील तयारी करीत आहोत," असे ते म्हणाले. तसेच महायुती अधिक मजबूत करण्यावरही आमचा भर आहे, असे त्यांनी नमूद केले.
नागरिकांशी संवादातून मुद्दे समजून घेणे
शनिवारी झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर ‘परिवार मिलन’ कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांनी रस्ते, पाणी, वीज, कचरा अशा मूलभूत समस्या प्रत्यक्ष समजून घेतल्या. काही ठिकाणी नवीन विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली.
संजोग वाघेरे यांच्या पुनरागमनाची चर्चा
शिवसेना (उबाठा) मध्ये गेलेले संजोग वाघेरे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतणार अशी चर्चा सुरू आहे. यावर पवार म्हणाले, "संजोग वाघेरे यांना शिवसेनेची विचारधारा पटली म्हणून ते गेले, मात्र त्यांच्या पत्नी उषा वाघेरे आमच्या विचारधारेत राहिल्या."
हाफकिन संस्थेला निधीची हमी
पिंपरीतील हाफकिन संस्थेला भेट देताना पवार म्हणाले की, संस्थेला आवश्यक त्या सोयी उपलब्ध नाहीत. या संस्थेला १५० कोटी रुपयांची गरज असून, त्यासाठी मुंबईत बैठक होईल. आगामी अर्थसंकल्पात संस्थेला मदत करण्यासाठी निधी दिला जाईल, अशी हमी त्यांनी दिली.


