Gunratna Sadavarte: मराठा आरक्षणास विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केला. आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, मात्र सदावर्ते सुखरूप आहेत.
जालना: मराठा आरक्षणास विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर रविवारी दुपारी मराठा आरक्षण आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काकडे पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
काय घडलं नेमकं?
अॅड. सदावर्ते हे समृद्धी महामार्गाने मुंबईहून जालना येथे जात होते. त्यांचा धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्याचा कार्यक्रम होता. दरम्यान, जालन्याजवळ काकडे पेट्रोल पंपाजवळ काही मराठा आंदोलकांनी त्यांना अडवले. संतप्त आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या कारवर दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही शारीरिक इजा झाली नाही.
आंदोलन आणि विरोधाची पार्श्वभूमी
अॅड. सदावर्ते यांनी याआधी मराठा आरक्षणावर आणि आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर संविधानिक चौकटीतून टीका केली होती. त्यांनी हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्यांवर आक्षेप घेत संविधानाच्या विरोधात असल्याचे मत मांडले होते. यामुळे मराठा समाजात त्यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे.
“अशा हल्ल्यांना घाबरत नाही”, सदावर्ते यांची प्रतिक्रिया
हल्ल्यानंतरही अॅड. सदावर्ते यांनी आपली भेट रद्द न करता जालन्याच्या दिशेने प्रयाण केले. उपोषणस्थळी पोहोचल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, "अशा हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही. संविधानाच्या चौकटीत राहूनच लढा सुरू राहील." त्यांनी धनगर समाजाच्या मागण्या आणि आदिवासी प्रवर्गातील आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.
पोलिसांची तत्परता
या संपूर्ण घटनेदरम्यान पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.


