बाळाच्या जन्मानंतर त्याच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणं पालकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेताना जास्त काळजी घ्यावी लागते.
मुंबई : बाळाच्या जन्मानंतर त्याच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणं पालकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेताना जास्त काळजी घ्यावी लागते. अनेक पालकांना वाटतं की बाळाला रोज आंघोळ घातल्यास किंवा सुगंधी साबण, बॉडी वॉश लावल्यास ते जास्त स्वच्छ आणि निरोगी राहील. पण डॉक्टरांच्या मते, हा विचार अनेकदा हानिकारक ठरू शकतो. नवजात बाळाची त्वचा मोठ्यांच्या तुलनेत ५ पट जास्त पातळ आणि नाजूक असते. त्यामुळे थोड्याशा चुकीनेही रॅश, ॲलर्जी किंवा इन्फेक्शन होऊ शकतं.
रोज आंघोळ घालणं गरजेचं आहे का?
नाही. जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांत बाळाला रोज आंघोळ घालण्याची गरज नसते. डॉक्टरांच्या मते, आठवड्यातून २-३ वेळा कोमट पाण्याने आंघोळ घालणं पुरेसं आहे. रोज आंघोळ घातल्यास बाळाच्या त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होतं, ज्यामुळे त्वचा कोरडी पडून फाटू शकते. बाकीच्या दिवशी हलक्या गरम पाण्यात मऊ कापड भिजवून गळा, काख, आणि डायपर एरियाचे भाग चांगले पुसून घ्या. याला स्पंज बाथ म्हणतात.
साबण किंवा बॉडी वॉश वापरावा का?
अजिबात नाही. जन्मानंतर पहिल्या १ महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा साबण, बॉडी वॉश, शॅम्पू न वापरणं चांगलं. फक्त स्वच्छ पाणी पुरेसं आहे.
जर वापरायचंच असेल तर—
- सुगंधी, रंग किंवा केमिकल असलेला साबण अजिबात वापरू नका.
- pH 5.5 असलेला, पॅराबेन आणि सल्फेट फ्री, विशेषतः नवजात बाळांसाठी बनवलेला माइल्ड क्लिन्झर वापरा.
- दिवसातून एकदापेक्षा जास्त साबण वापरू नका.
आणखी काय काळजी घ्याल?
- तेल मालिश: आंघोळीपूर्वी खोबरेल तेल किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या तेलाने हलक्या हाताने मालिश करू शकता. मोहरीचं तेल किंवा खूप जास्त तेल लावू नका.
- मॉइश्चरायझर: आंघोळीनंतर लगेच बाळाची त्वचा थोडी ओलसर असतानाच बेबी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मऊ राहील.
- डायपर रॅश: डायपर जास्त वेळ ओला राहिल्यास रॅश येतात. त्यामुळे दर २-३ तासांनी डायपर बदला आणि प्रत्येक वेळी डायपर एरिया चांगला पुसून कोरडा करा.
- कपडे: नवीन कपडे नेहमी धुवून, उन्हात वाळवून मगच घाला. सिंथेटिक नाही, तर सुती मऊ कपडे वापरा.
- पावडर नको: बेबी पावडर बाळाच्या श्वासनलिकेत जाऊ शकते. त्यामुळे पावडर वापरणं टाळा.
लक्षात ठेवा, नवजात बाळासाठी कमी प्रसाधनंच सर्वात चांगली असतात. जास्त स्वच्छतेच्या नादात त्यांच्या नाजूक त्वचेचं नुकसान करू नका. कोणताही रॅश, लालसरपणा किंवा खूप कोरडेपणा दिसल्यास स्वतःहून काहीही न लावता बालरोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.










