काहींची नजर खूप वाईट असते. त्यांनी नुसतं पाहिलं तरी दृष्ट लागते, असा आपला समज आहे. या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी एक सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वाईट नजर लागू नये म्हणून लहान मुलांच्या कपाळावर, कानाच्या मागे किंवा गालावर काजळाचा टीट लावताना तुम्ही पाहिलं असेल. याशिवाय पायात काळा धागाही बांधला जातो. पण आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत, तो थोडा वेगळा आहे.

पायाच्या तळव्याला लावा काजळ

आपल्याला कोणाची वाईट नजर लागू नये, सुरू केलेलं काम अर्धवट राहू नये आणि आयुष्यात सगळं काही सुरळीत चालावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण काळा धागा बांधणे, काजळाचा टीट लावणे असे अनेक उपाय करतात. टॅरो रीडर साक्षी सिंघल यांच्या मते, वाईट नजरेपासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पायाच्या तळव्याला काजळ लावलं पाहिजे. फक्त लहान मुलेच नाही, तर महिला आणि पुरुषही हा उपाय करू शकतात.

नेमकं काय करायचं?

रोज थोडंसं काजळ करंगळीच्या शेजारच्या बोटाने (अनामिका) घेऊन पायाला लावायचं आहे. पायाच्या तळव्याच्या मध्यभागी काजळाचा एक छोटासा टीट लावायचा आहे. हे बाहेरून कोणालाही सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे अनेक जण हा उपाय फॉलो करतात.

नवीन काम सुरू करताना

कोणतंही नवीन काम, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन प्रयत्न सुरू करण्यापूर्वी काजळ लावल्यास वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं, असा समज आहे. जर तुम्ही सुरू केलेल्या कामात सतत अडथळे येत असतील, तर हा उपाय सलग २१ दिवस करून पाहा, तुम्हाला नक्कीच बदल दिसेल. तुम्हाला रोज तुमच्या पायाला काजळ लावायचं आहे.

२१ दिवसच का?

अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार, कोणतीही सवय किंवा उपाय सलग २१ दिवस करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच हा काजळाचा उपायही २१ दिवस सलग करायला सांगितला आहे.

काजळाला इतकं महत्त्व का?

आपल्या परंपरेत काळा रंग हा वाईट नजर किंवा नकारात्मकता दूर करण्याचं प्रतीक मानला जातो. लहान मुलांना काळा टीट लावणं, वाहनांना काळा धागा बांधणं, घराच्या दारावर दृष्ट लागू नये म्हणून काळी बाहुली लावणं, अशा अनेक गोष्टी याच्याशी जोडलेल्या आहेत. नवीन घरात प्रवेश करताना किंवा नवीन वाहन खरेदी करताना दृष्ट लागू नये म्हणून अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात.