राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना RSS नोंदणीकृत नसली तरी वैध असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की संघ कोणत्याही पक्षाला नव्हे, तर राष्ट्रहिताच्या धोरणांना पाठिंबा देतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिलं. त्यांनी यावेळी बोलताना RSS ही नोंदणीकृत संस्था नसली तरी तिचे कार्य आणि अस्तित्व पूर्णपणे वैध असल्याचं म्हटलं आहे. बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, संघाची स्थापना 1925 मध्ये झाली असून, त्यावेळी संस्थांची नोंदणी अनिवार्य नव्हती. “संघाचा उद्देश समाज एकत्र आणणे आणि राष्ट्रहितासाठी काम करणे हा आहे,” असे भागवत यांनी सांगितले.
काँग्रेसने आरएसएसवर बंदीची केली होती मागणी
काँग्रेसने अलीकडेच RSS वर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना भागवत म्हणाले, “संघावर पूर्वी तीन वेळा बंदी घालण्यात आली होती, पण प्रत्येकवेळी सत्य आणि कायदा आमच्या बाजूने होते, त्यामुळे संघ पुन्हा उभा राहिला.” त्यांनी पुढे सांगितले की अनेक गोष्टी नोंदणीकृत नसतात, जसे की हिंदू धर्मही अधिकृतपणे नोंदणीकृत नाही, तरी त्याचे अस्तित्व आणि स्वीकृती सर्वमान्य आहे.
RSS विशिष्ट पक्षाला देत नाही समर्थन
राजकीय भूमिकेबाबत बोलताना भागवत म्हणाले की, RSS कोणत्याही विशिष्ट पक्षाला थेट समर्थन देत नाही. “आम्ही व्यक्ती किंवा पक्षाकडे पाहत नाही, आम्ही राष्ट्रहिताच्या धोरणांकडे पाहतो. ज्यांचे कार्य देशहिताचे असेल, त्याच्यासोबत समाज आपोआप उभा राहतो,” असे ते म्हणाले. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, राम मंदिराच्या मुद्द्यावर जो पक्ष पुढे आला त्याला लोकांनी पाठिंबा दिला, आणि जर त्या वेळी काँग्रेसनेही पाठिंबा दिला असता तर स्वयंसेवक त्यांच्याही पाठीशी उभे राहिले असते.
संघात केला जात नाही भेदभाव
संघात धर्म किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव केला जात नाही, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. “शाखेत येणाऱ्यांची आम्ही जाती-धर्माची चौकशी करत नाही. शाखेत येणारा प्रत्येकजण भारत माता पुत्रच असतो,” असे ते म्हणाले. तसेच तिरंग्याबद्दलही त्यांनी सांगितले की, संघाने नेहमीच राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान केला आहे आणि देशासाठी कार्य करणे हेच संघाचे प्रमुख ध्येय आहे.


