नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगांडाच्या उपाध्यक्ष जेसिका अलुपो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. याशिवाय त्यांनी फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली आणि परिषदेच्या खुल्या सत्राला संबोधित केलं.

मुंबई : नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स परिषद सुरू आहे. या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारत मंडपममध्ये युगांडाच्या उपाध्यक्ष जेसिका अलुपो यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. जेसिका अलुपो या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारीच नवी दिल्लीत दाखल झाल्या होत्या. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी त्यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे, युगांडा हा ब्रिक्स समिट २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या १० भागीदार देशांपैकी एक आहे.

भारत 'Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability' या संकल्पनेखाली दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. याच दरम्यान पंतप्रधान मोदी आणि अलुपो यांची ही भेट झाली. याआधी रविवारीच मोदींनी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. मार्कोस ज्युनियर हे आसियान (ASEAN) चे सध्याचे अध्यक्ष म्हणून या परिषदेला उपस्थित आहेत. भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणाच्या आणि आसियानसोबतच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीने त्यांची ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे.

पंतप्रधान मोदींचं ब्रिक्स परिषदेत संबोधन, 'ठोस निकालांची' अपेक्षा

दरम्यान, रविवारी ब्रिक्स परिषदेच्या खुल्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रिक्स आता तिसऱ्या दशकात प्रवेश करत आहे आणि जगाला आता या गटाकडून 'ठोस निकालांची' अपेक्षा आहे. मोदी म्हणाले, 'ब्रिक्स तिसऱ्या दशकात पदार्पण करत आहे. जगाला आता आपल्याकडून केवळ कल्पना आणि वचनं नकोत, तर ठोस परिणाम हवे आहेत. मला खात्री आहे की, आपल्या एकत्रित प्रयत्नांतून आपण या अपेक्षा नक्कीच पूर्ण करू.' यावेळी त्यांनी २०२७ मध्ये होणाऱ्या पुढील ब्रिक्स परिषदेचं यजमानपद भूषवणाऱ्या चीनला शुभेच्छा दिल्या आणि नवी दिल्लीतील परिषद यशस्वी केल्याबद्दल सर्व नेत्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.

याआधी पंतप्रधान मोदींनी भारत मंडपममध्ये ब्रिक्स सदस्य देश, भागीदार देश, आमंत्रित सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांचं स्वागत केलं.

रविवारी ब्रिक्स नेत्यांनी 'Resilience, Innovation, Cooperation and Sustainability: Shaping the Future for Inclusive Global Growth' या विषयावर एका सत्रात चर्चा केली.

पंतप्रधान म्हणाले की, 'ग्लोबल साऊथ' देशांचा ब्रिक्सवरील विश्वास वाढला आहे. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, एमएसएमई (MSME) सहकार्य आणि पर्यावरण यांसारख्या उपक्रमांवर भर दिला. मोदींनी सांगितलं की, भारताने ब्रिक्सच्या माध्यमातून मैत्री, भागीदारी आणि सहकार्याची भावना पुढे नेली आहे. या सहकार्यात उद्योजक, शेतकरी, संशोधक, महिला, तरुण आणि सामान्य नागरिक यांचाही समावेश असावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ग्लोबल साऊथसाठी मजबूत भूमिकेचं शी जिनपिंग यांचं आवाहन

या परिषदेत सहभागी झालेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 'ग्लोबल साऊथ'च्या हितासाठी ब्रिक्सने अधिक मजबूत भूमिका बजावावी, असं आवाहन केलं. ब्रिक्सने आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये 'एक सक्रिय, स्थिर आणि सकारात्मक शक्ती' बनायला हवं, असं ते म्हणाले. चीन २०२७ मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद स्वीकारणार असून १९ व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करणार आहे.