दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने केलेल्या आंदोलनामुळे मोठा तणाव निर्माण झालाय. निवडणूक आयोगाचा कारभार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवलं. यावेळी पोलिसांनी अनेक खासदारांना ताब्यात घेतलं आहे.
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एक बैठक झाली. या बैठकीत पुढची रणनीती ठरल्यानंतर, सर्व खासदार तीन बसेसमधून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले. तिथे पोहोचून त्यांना आंदोलन करायचं होतं. पण पोलिसांनी जनपथजवळच मोठे बॅरिकेड्स लावून त्यांना मध्येच अडवलं.
निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले खासदार, राहुल आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच ठाण मांडून
पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर अनेक विरोधी खासदार रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले. आपण इथून हलणार नाही, अशी ठाम भूमिका राहुल गांधींनी घेतली. यावेळी पोलीस आणि राहुल गांधी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रियांका गांधींनी केला. या गोंधळात काँग्रेसचे खासदार आणि कार्यकर्त्यांनी राहुल आणि प्रियांका यांच्याभोवती कडे केले.
पोलिसांनी एकेकाला घेतलं ताब्यात
आंदोलकांना तिथून हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने परिस्थिती आणखीच चिघळली. पोलिसांनी अनेक खासदार आणि कार्यकर्त्यांना एकेक करून ताब्यात घेण्यास सुरुवात केली. राहुल गांधींनाही पोलिसांनी एका गाडीत बसवून तिथून नेलं. प्रियांका गांधींसह इतर विरोधी खासदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामुळे जनपथ परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने तिथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
दिल्ली पोलीस आधीच होते अलर्ट
विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी मध्य दिल्लीत सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली होती. निवडणूक आयोगाचे कार्यालय आणि जंतरमंतरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. महत्त्वाच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विनापरवाना रॅली आणि आंदोलने रोखण्यासाठी पोलिसांनी आधीच तयारी केली होती. मंगळवारी झालेल्या आंदोलनातही पोलिसांनी विरोधी खासदारांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिकाऱ्यांनी आधीच खबरदारी घेतली होती.
राजीनामा मिळेपर्यंत माघार नाही, विरोधकांचा इशारा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर विरोधी पक्ष ठाम आहेत. निवडणूक प्रक्रियेतील अनेक त्रुटी आणि आक्षेप केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यासाठीच आपण हे आंदोलन करत असल्याचं विरोधी नेत्यांनी स्पष्ट केलं. या मुद्द्यावर आता मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकार लोकशाही व्यवस्था कमकुवत करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. दुसरीकडे, आंदोलनाला परवानगी नसल्याचं सांगत पोलिसांनी नेत्यांना अडवलं. यामुळे देशाच्या राजधानीत सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

