भारतीय शूटर्सना त्यांच्या हॉटेलपासून शूटिंग रेंजपर्यंत पोहोचण्यासाठी रोज सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. दोन तासांच्या या प्रवासामुळे खेळाडूंना पहाटेच उठावं लागत असून त्यांच्या सरावावरही परिणाम होत आहे.

नगोया: एशियन गेम्सच्या आयोजनावर भारतीय शूटिंग टीमने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लांबचा प्रवास आणि गैरसोयींमुळे ३० जणांच्या शूटिंग स्क्वॉडचे चांगलेच हाल होत आहेत. ऑलिम्पिक मेडल विजेती मनू भाकर आणि एशियन गेम्स मेडल विजेती ईशा सिंग यांसारख्या स्टार खेळाडूंना वेळेवर सराव करता येत नसल्याने त्या त्रस्त आहेत.

शूटर्स ज्या हॉटेल्समध्ये थांबले आहेत, तिथून शूटिंग रेंजवर पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल दोन तास लागतात. सरावासाठी रोज सुमारे ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे खेळाडूंना पहाटेच झोप मोडावी लागते. सकाळी ६ वाजता नाश्ता करून निघाल्यावरच ते ठरलेल्या वेळी प्रॅक्टिससाठी पोहोचू शकतात. विशेष म्हणजे, आयची-नगोया एशियन गेम्समध्ये 'गेम्स व्हिलेज'ची सुविधा नसल्याने खेळाडूंना वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहावं लागत आहे.

सर्व खेळाडू एकत्र आल्यावरच त्यांना प्रॅक्टिससाठी निघता येतं. वेळेचं नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये थांबलेले भारतीय खेळाडू एकाच हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी एकत्र जमतात. तिथून सर्वजण एकाच बसने शूटिंग रेंजकडे निघतात. खेळाडू वेळेवर तयार असतात, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासाठी ठरवलेली बसच लेट येत आहे. यामुळे भारतीय शूटर्सच्या प्रॅक्टिसचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. प्रवासातील या अडचणी आणि राहण्याच्या ठिकाणच्या गैरसोयींबाबत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) कडे तक्रार केल्याचं शूटिंग टीमच्या कोचने स्पष्ट केलं आहे. शूटिंगचे सामने २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.